Haal Malayalam Movie Controversy : केरळ उच्च न्यायालयाने ‘हाल’ या मल्याळम चित्रपटाचा सेन्सॉर मंडळाच्या (CBFC) निर्णयावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना स्वतः चित्रपट पाहण्यास सहमती दर्शवली आहे. या चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमातील १५ दृश्यांमध्ये बदल करण्याचे आदेश दिले होते, ज्यामध्ये बीफ बिर्याणी खाण्याचे प्रसंगही आहेत.

न्यायमूर्ती व्ही. जी. अरुण यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने, याचिकेतील विनंतीनुसार चित्रपट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही बाजूंनी उपस्थित असलेल्या वकिलांसमवेत हा चित्रपट पाहण्यात येणार येणार आहे. पण चित्रपट नेमका कधी पाहिला जाणार, याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

सेन्सॉरने या सिनेमातील १५ सीन काढून टाकण्याचा सल्ला दिला आणि त्यात कोणतेही बदल झाले तरी चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्रच राहील, असे सांगितल्यानंतर हा वाद सुरू झाला. चित्रपटातील दृश्यांमध्ये बीफ बिर्याणी खाण्याच्या प्रसंगांवर काही गटांनी आक्षेप घेतले आहेत.

या खटल्यात कॅथलिक काँग्रेस या संस्थेलाही पक्षकार म्हणून सामील होण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कॅथलिक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, “चित्रपटाची कथा लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी आहे. जर अशा दृश्यांना परवानगी दिली आणि चित्रपट प्रदर्शित झाला, तर ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील आणि सामाजिक सलोखा बिघडू शकतो.”

या प्रकरणातील पुढील सुनावणी मंगळवारी होणार असून, त्यावेळी चित्रपटाची पाहणी कुठे आणि कधी होईल याबद्दलची माहिती दिली जाईल. न्यायालय स्वतः चित्रपटाची संपूर्ण तपासणी करून त्याचे सामाजिक परिणाम ठरवू शकते.

चित्रपटाचे निर्मात्यांकडून न्यायालयाच्या या निर्णयावर किंवा CBFC व कॅथलिक काँग्रेसने घेतलेल्या आक्षेपांवर अजून कोणतेही अधिकृत उत्तर दिलेले नाही. त्यामुळे चित्रपटाचं अंतिम प्रमाणपत्र आणि प्रदर्शनाची तारीख उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून आहे.