छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’ सध्या बराच चर्चेत आहे. हा एक स्टंट बेस रिअ‍ॅलिटी शो असून यात टीव्ही क्षेत्रातील नामवंत कलाकार कठिण स्टंटस् परफॉर्म करताना दिसतात. हा शो लवकरच आपल्या भेटीला येणार असून या शोचं चित्रीकरण अफ्रिकेतील ‘केपटाउन’ या शहरात झाले आहे. या शोचे सूत्रसंचालन रोहित शेट्टी करताना दिसेल.

गेले काही दिवस ‘खतरों के खिलाडी  ११’ हा शो सतत चर्चेत असून नुकताच या शोचा लॉंच इव्हेंट झाला होता. यावेळी शोचा सूत्रसंचालक रोहित शेट्टी आणि इतर स्पर्धकांची उपस्थिती तिथे दिसली. एक मुलाखतीत रोहित शेट्टीने शो बद्दल आणि स्पर्धकांबद्दल बोलताना दिसला. त्यावेळेस त्याने सांगितले की “सगळेच स्पर्धक तसे खूप धाडसी आहेत. सुरवातीला सगळ्यांनाच भीती वाटत होती. एक तर कोविडचं वातावरण सुरु आहे, अशात कलाकार स्वतः स्टंट परफॉर्म करणार हे सगळे एकूणच चॅलेंजींग होते. सगळ्यांची जबाबदारी होती आणि आम्ही सगळे घरी सुखरूप परत आलो या गोष्टीचा मला आनंद आहे.

पुढे जेव्हा त्याला विचारले की कोणाचा परफॉर्मन्स अचंबित करणारा होता? त्यावेळेस त्यानी सांगितले की “सगळेच उत्तम होते पण दिव्यांका त्रिपाठीचा परफॉर्मन्स सर्वात जास्त अचंबित करणारा होता. एकंदरीत मला अंदाज असतो की कोण किती धाडसी आहे, पण दिव्यांकाचा परफॉर्मन्स पाहून मीच चक्रवलो. ती खूप धाडसी आहे. तसंच विशाल पण खूप धाडसी आहे. अर्जुनने पण खूप छान स्टंट परफॉर्मन्स केला. खरंतर खतरो के खिलाडी चा फॉरमॅटच असं आहे की ज्यात तुम्हाला धाडसी बनावे  लागते” अशा आशयाच्या प्रतिक्रिया रोहित शेट्टीने स्पर्धकांबद्दल मांडल्या आहेत.

दरम्यान या शो मध्ये अनुष्का सेन, राहुल वैद्य, वरुण सुद, विशाल आदित्य सिंग, सना मकबुल बरोबर सौरभ राज जैन,आस्था गिल, महक चहल, दिव्यांका त्रिपाठी, अभिनव शुक्ला देखील स्टंट करताना दिसतील. हा शो १७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.