बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर यांना कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्या कॅन्सरवर उपचार घेत होत्या. पण आता किरण यांनी कॅन्सरवर मात केली असून त्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्या छोट्या पडद्यावरील एका शोमध्ये परीक्षक म्हणून काम करताना दिसणार आहेत.
लवकरच इंडियाज गॉट टॅलेंटचा ९वा सिझन येत आहे. या सिझनमध्ये किरण खेर परीक्षक म्हणून दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रॅपर बादशाह देखील परीक्षक म्हणून दिसणार आहे. २००९ पासून किरण खेर इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये परीक्षक म्हणून दिसत आहेत. आता पुन्हा एकदा शो मध्ये काम करण्यासाठी किरण खेर या फार उत्सुक आहेत.
आणखी वाचा : कपिल शर्मा करणार होता आत्महत्या, शाहरुख खान आला मदतीला धावून
इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये परीक्षक म्हणून काम करण्याबाबत किरण खेर म्हणाल्या, ‘हा शो माझ्या हृदयाजवळचा आहे. या रिअॅलिटी शोसोबत मी गेली ९ वर्षे जोडली गेली आहे. शोमध्ये परीक्षक म्हणून काम करण्याचा अनुभव फार वेगळा आहे. मला असे वाटते मी माझ्या घरी परत आले आहे. देशातील अनेकांना या मंचावर संधी मिळते.’
खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण सूद यांनी ३१ मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेला खासदार किरण खेर या अनुपस्थित होत्या. त्यावेळी अरुण यांनी किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती दिली. ६८ वर्षी खेर यांना गेल्यावर्षी या आजाराचं निदान झालं होतं. सध्या त्या उपचार घेत असून मुंबईमध्ये आहेत अशी माहितीही अरुण सूद यांनी दिली होती. आता किरण यांनी कॅन्सरवर मात केली असून त्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.