प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर, त्यांची मुलगी आस्मा, अभिनेता दिग्दर्शक विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस आणि ख्यातनाम नाटककार, लेखक मधुसूदन कालेलकर यांची नात गौरी कालेलकर अशी सगळी नामवंत मंडळी ‘एक तिची गोष्ट’ या नव्या नृत्यनाटिकेच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.

ख्यातनाम नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य / चित्रपट निर्माता अशा बहुविध भूमिकेतून रसिकांना अखंड रिझवणारे ज्येष्ठ लेखक कै. मधुसूदन कालेलकर यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत त्यांच्या नातीने गौरी कालेलकर-चौधरी आणि तिचे पती सिद्धेश चौधरी यांनी ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेची स्थापना केली आहे. कलासंस्कृतीचे व्रत जोपासणाऱ्या या निर्मिती संस्थेने, संस्थेचे सदस्य परी तेलंग आणि शंतनू तेंडुलकर यांच्या सहकार्याने आणि ‘थिएटर ऑन एंटरटेनमेंट’, ‘पीएसडीजी स्टुडिओज प्रॉडक्शन’ यांच्या साथीने ‘एक तिची गोष्ट’ रंगमंचावर आणली आहे.

‘एक तिची गोष्ट’ या नव्या नृत्यनाटिकेचा शुभारंभ ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’मध्ये झाला होता. नृत्य, संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची गोष्ट’चे पुढील प्रयोग शनिवारी, २४ मे रोजी रात्री ८.३० वाजता श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. या सृजनशील कलाकृतीचं खास आकर्षण म्हणजे फुलवा खामकर आणि त्यांची मुलगी आस्मा खामकर यांच्या नृत्याची अदाकारी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. अभिनेता विराजस कुलकर्णी, सूरज पारसनीस यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. आर्या आंबेकर, वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे यांनी यातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. संगीत निषाद गोलांब्रे यांचे आहे. चाळिशीतली अनया आणि तिच्या आयुष्यात आलेली एक किशोरवयीन मुलगी या दोघींच्या भावविश्वातून या नृत्यनाटिकेची कथा उलगडते. येत्या काळात मराठी कला, साहित्य आणि संस्कृती सर्वदूर पोहोचवणं हे ‘मधुसूदन कालेलकर प्रॉडक्शन्स’चं उद्दिष्ट असल्याचं गौरी कालेलकर-चौधरी यांनी स्प्ष्ट केलं.