लोकप्रिय तेलुगू अभिनेता वरुण तेज १० सप्टेंबर रोजी बाबा झाला. वरुण तेजची पत्नी लावण्या त्रिपाठी हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. लावण्या व वरुण यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुलाचं नाव ठेवलं. वरुण तेजने इन्स्टाग्रामवर मुलाचा फोटो शेअर करून नाव व नावाचा अर्थ सांगितला.

वरुण तेज कोनिडेला आणि लावण्या त्रिपाठी यांनी १० सप्टेंबर २०२५ रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. वरुण तेज हा नागेंद्र बाबू यांचा मुलगा आहे. वरुण हा मेगास्टार चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचा पुतण्या आहे.

वरुण व लावण्या यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या मुलाचे नाव जाहीर केले आहे. वरुण तेजने सोशल मीडियावर फोटो शेअर करून मुलाचे नाव ‘वायुव तेज कोनिडेला’ ठेवल्याची माहिती शेअर केली. मुलाच्या जन्मानंतर जवळजवळ तीन आठवड्यांनी, वरुणची भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे.

वरुण तेजच्या मुलाचं नाव व त्याचा अर्थ

वरुण तेजने पोस्टमध्ये लिहिलं, “आमच्या सर्वात मोठ्या आशीर्वादाचे आता एक नाव आहे.” त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये वरुण यांनी मुलाच्या नावाचा अर्थही सांगितला. “अजिंक्य शक्ती, भक्ती, साहस आणि आध्यात्मिक तेजाचे प्रतीक असलेले नाव. हाच आमच्या प्रिय मुलाचा, वायु तेज कोनिडेलाचा परिचय आहे,” असं वरुणने लिहिलंय.

वरुणने एक व्हिडीओ व दोन फोटो शेअर करून त्यांनी आपल्या मुलाचे नाव जाहिर केले. लावण्या व वरुण फोटोंमध्ये वायुवकडे प्रेमाने बघत आहेत. वरुणच्या पोस्टवर भाऊ राम चरण, अल्लू अर्जुनपासून ते काजल अग्रवालसह अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत.

वरुण आणि लावण्या यांनी दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०२३ मध्ये इटलीतील टस्कनी येथे एका भव्य समारंभात लग्न केलं होतं. दोन वर्षांनंतर ते गोंडस मुलाचे आई-बाबा झाले.