प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेते रसिक दवे यांचं शुक्रवारी रात्री ८ वाजता निधन झालं. मुंबईतमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रसिक दवे हे ‘महाभारत’मधील ‘नंद’ या व्यक्तिरेखेसाठी ओळखले जात होते. याशिवाय त्यांनी अनेक गुजराती नाटके, गुजराती चित्रपट आणि अनेक मालिकांमध्येही काम केले. या सगळ्याशिवाय ते प्रसिद्ध अभिनेत्री केतकी दवे यांचे पती होते. जवळपास मागच्या दोन वर्षांपासून ते डायलिसिसवर होते आणि त्यांना आठवड्यातून तीनदा रुग्णालयात जावे लागत होते.

रसिक दवे दोन वर्षांहून अधिक काळ मुंबईतील रुग्णालयात डायलिसिसवर होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. ते आठवड्यातून तीनदा रुग्णालयात उपचारासाठी जात असत, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. रसिक दवे यांनी अनेक गुजराती नाटके आणि चित्रपटांमध्येच काम केले नाही, तर त्यांनी अनेक गुजराती नाटकांचे दिग्दर्शन व निर्मितीही केली.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्वीट करत रसिक दवे यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘किडनी निकामी झाल्यामुळे टीव्ही आणि चित्रपटांमधील अष्टपैलू अभिनेता आणि प्रिय मित्र रसिक दवे यांचे निधन झाले हे सांगताना खूप दुःख होत आहे. त्यांच्या पत्नी केतकी दवे आणि कुटुंबीय यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तुम्ही नेहमी स्मरणात राहाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रसिक दवे शेवटचे ‘कलर्स टीव्ही’वरील ‘संस्कार-धरोहर अपना की’ या मालिकेत दिसले होते. या मालिकेत त्यांनी करसनदास धनसुखलाल वैष्णव यांची भूमिका साकारली होती. याशिवाय रसिक दवे याआधी ‘सोनी टीव्ही’च्या सर्वात दीर्घकाळ चाललेल्या ‘एक महल हो सपनो का’ या मालिकेत काम केलं होतं. हा शो १००० भाग पूर्ण करणारा पहिला हिंदी शो मानला जातो. तसेच त्यांनी दूरदर्शनवरील प्रसिद्ध शो ‘व्योमकेश बक्षी’ मध्येही काम केलं होतं. हा शो एका प्रसिद्ध गुप्तहेरावर आधारित कथा होता.