२६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित ‘मेजर’ (Major) हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच अनेक समीक्षकही या चित्रपटाची स्तुती करताना दिसत आहे. या चित्रपटाने जगभरात ५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. नुकतंच या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी मेजर चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

मेजर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आदिवी शेष यांनी २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या नावाने निधीची घोषणा केली. हा निधी दिवंगत मेजरचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर देशभरातील CDS आणि NDA इच्छुकांना मदत करण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून केला जाणार आहे.

त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी देशभरातील CDS (संयुक्त संरक्षण सेवा) आणि NDA (नॅशनल डिफेन्स अकादमी) इच्छुकांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या निधीला पूर्ण पाठिंबा दिला. तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मेजर’ हा केवळ चित्रपट नाही, ती एक सांस्कृतिक घटना आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, आदिवी यांनी मेजर संदीप उन्नीकृष्णन फंडाविषयी सविस्तर चर्चा केली. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी या चित्रपटातील कलाकारांचे विशेष कौतुक केले. तसेच येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्या अशा महत्त्वाच्या आणि समर्पक विषयावर चित्रपट बनवल्याबद्दल टीमचे अभिनंदन केले. या भेटीदरम्यान काहींनी या दहशतवादी हल्ल्यादरम्यान अनुभवलेले त्यांचे वैयक्तिक अनुभव देखील शेअर केले.

“महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची अविश्वसनीय संधी. त्यांनी NDA इच्छुकांसाठी आमच्या प्रमुख वचन निधीसाठी पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले. तो एक अविश्वसनीय क्षण होता. आमच्या चित्रपटासाठी अप्रतिमरित्या कौतुक केल्याबद्दल धन्यवाद सर. येत्या काही दिवसांत आम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाला हा चित्रपट दाखवू. आदित्य ठाकरे यांनाही भेटून आनंद झाला. महेश मांजरेकर यांचेही धन्यवाद, असे आदिवीनी यावेळी म्हटले.