दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टामनेनी यांचं १५ नोव्हेंबरला सकाळी निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना १३ नोव्हेंबरला हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता महेश बाबू आणि त्याचे कुटुंबीय या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. अशात आता महेश बाबूची मुलगी सितारा घट्टामनेनीने आजोबांसाठी लिहिलेली इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत आहे.

महेश बाबूची मुलगी सितारा घट्टामनेनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिने इनस्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये सिताराने आजोबा कृष्णा घट्टामनेनी यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोबरोबर तिने हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.

आणखी वाचा- महेश बाबूला वडिलांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक बनवायचा होता, पण त्याआधीच…

सिताराने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, “आता रोज दुपारचं जेवण नेहमीसारखं नसेल. तुम्ही मला अनेक महत्त्वापूर्ण गोष्टी शिकवल्या… मला नेहमीच हसवण्याचा प्रयत्न केला. आता हे सर्व फक्त आठवणीत राहणार आहे. तुम्ही माझे हिरो होता… मी आशा करते की एक दिवस माझा तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करेन. तुमची खूप आठवण येत राहील आजोबा…” सिताराची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी तिचं सांत्वन करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा- आधी भाऊ, मग आई अन् आता वडील…, दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू झाला पोरका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कृष्णा घट्टामनेनी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोठे नाव आहे. तेलुगु सुपरस्टार कृष्णा यांनी त्यांच्या अभिनयाने रुपेरी पडदा गाजवला होता. त्यांचं चित्रपटसृष्टीतील योगदान फार मोठं आहे. छोट्या भूमिका साकारत अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केलेल्या कृष्णा यांनी ३५० चित्रपटांत काम केलं होतं. पाच दशकं चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या कृष्णा यांनी १९६१ मध्ये कलाविश्वात पदार्पण केलं. १९६५ साली प्रदर्शित झालेल्या ‘थेने मनसुलु’ या चित्रपटात ते पहिल्यांदाच मुख्य नायकाची भूमिका साकारताना दिसले. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या तेलुगू सुपरस्टार कृष्णा यांच्यावर चाहतेही भरभरुन प्रेम करायचे.