आदिनाथ कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतलं एक नावाजलेलं नावं म्हणून ओळखलं जाते. आदिनाथने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आदिनाथ कोठारेला केवळ अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही ओळखले जाते. आदिनाथ कोठारे हा सध्या चंद्रमुखी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने दौलतराव देशमाने ही प्रमुख भूमिका साकारली आहे. नुकतंच एका मुलाखतीत आदिनाथने स्टार किड्स आणि घराणेशाहीबद्दल वक्तव्य केले.

चंद्रमुखी या चित्रपटाच्या यशानंतर नुकतंच आदिनाथ कोठारेने एका प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, “कोणत्याही क्षेत्रातील स्टार किडकडे बघताना प्रत्येकाला एक वेगळा विचार येतो. या मुलाल काय कमी असणार, त्याला सर्व आयतं मिळत असणार, त्याला त्याच्या आई-वडिलांच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर त्याच्यासाठी फार सोपं होईल. मला मनोरंजन क्षेत्रात करिअर करताना काहीही अडचणी येणार नाही, असेही बोललं जायचं.”

“पण मी एका मोठा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्मात्याचा मुलगा आहे हे मला कुटुंबाने कधीही जाणवू दिलं नाही. माझी शाळा पूर्ण होईपर्यंत मला महेश कोठारे यांच्या प्रसिध्दीचा गर्व येणार नाही, याची पुरेपूर काळजी आईनं घेतली. तसेच कॉलेजला जाण्यासाठी मी ट्रेनने प्रवास केला आहे. माझा छकुला या चित्रपटात मी बालकलाकार म्हणून काम केले. पण त्यानंतरही मला घरातून स्टार कीड्स आणि इतर काही खास वागणूक मिळाली पाहिजे असे मला वाटलं नाही. कारण माझ्या घरातून मला हे वातावरण मिळाले”, असे आदिनाथ म्हणाला.

“आदिनाथ हा महेश कोठारे यांचा मुलगा असल्यामुळे साहजिकच त्याच्या घरी सिनेसृष्टीतील कलाकारांचा येणे-जाणे असायचे. यामुळे माझ्या मनात सिनेसृष्टीबद्दल आवड निर्माण झाली. पण माझ्यावर कुटुंबाने कधीच कोणतीही बंधने घालण्यात आली नाहीत. मला ज्या क्षेत्रात करिअर करावंस वाटेल त्या क्षेत्रात जाण्याची मुभा होती”, असेही तो म्हणाला.

“माझ्यासाठी सिनेसृष्टीत प्रवेश हा सोपा असला तरी त्यात टिकून राहणे हे माझ्यावर अवलंबून होते. आदिनाथ कोठारे या नावाच्या मध्यभागी जरी महेश कोठारे हे नाव असल्याने सर्व सहज मिळेल असं वाटलं होतं, पण खऱ्या आयुष्यात असे काहीही झाले नाही. आमच्या घरात सर्वसामान्याप्रमाणेच वातावरण होतं, पण जे आवडेल ते करण्यासाठी पाठिंबा होता. त्यानंतरच मी माझ्या आवडीचं पाणी चाखायचं ठरवले आणि तेच पाणी गोड लागलं”, असेही त्याने म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात दमदार दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसत आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर पाहायला मिळत आहे. याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे.