मराठी चित्रपट ‘झी स्टुडिओ’कडे असेल तर त्याची योग्य प्रसिद्धी होऊन त्याला तिकीटबारीवर यश मिळणारच हे अचूक समीकरण झाले आहे. त्यामुळे आपला चित्रपट प्रसिद्धी-वितरण-विपणनासाठी ‘झी स्टुडिओ’कडेच जावा, असा निर्मात्यांचा आग्रह असतो. ‘दे धक्का’ या चित्रपटापासून ‘झी’बरोबर असणाऱ्या, त्यांच्याचबरोबर ‘नटसम्राट’सारखा यशस्वी चित्रपट देणाऱ्या निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनाही आपला आगामी ‘एफयू’ हा चित्रपट ‘झी स्टुडिओ’नेच घ्यावा असे वाटत होते. मात्र या चित्रपटासंदर्भात झालेल्या मतभेदांमुळे मांजरेकर आणि ‘झी स्टुडिओ’ यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. या वादाचा परिणाम म्हणून ‘झी’च्या कोणत्याही व्यासपीठावरून ‘एफयू’ची प्रसिद्धी न करण्याचा निर्णय ‘झी’ समूहाने घेतला असल्याचे सूत्रांकडून समजते.

‘एफयू’ (फ्रेंडशीप अनलिमिटेड) Fu Marathi Movie हा महेश मांजरेकर निर्मित, दिग्दर्शित चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘सैराट’फेम आकाश ठोसरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सध्या खुद्द बॉलीवुड अभिनेता सलमान खान याची भक्कम साथ मिळाली आहे. मात्र हा चित्रपट ‘झी स्टुडिओ’ने वितरणासाठी घ्यावा, यासाठी मांजरेकर प्रयत्नशील होते. ‘एफयू’ हा संगीतप्रधान चित्रपट असल्याने यात तब्बल १४ गाणी आहेत. या चित्रपटासंदर्भात महेश मांजरेकर आणि ‘झी स्टुडिओ’ यांच्यात मतभेद झाल्याने हा चित्रपट करण्यास त्यांनी नकार दिला. अखेर मांजरेकरांनी ‘टी सीरीज’ कंपनीला या चित्रपटाचे हक्क विकले. या वादामुळेच ‘एफयू’ची जाहिरात किंवा प्रसिद्धी ‘झी’च्या कोणत्याच व्यासपीठावरून केली जात नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात बोलताना, सध्या मराठी चित्रपटांना योग्य ती प्रसिद्धी मिळवून देण्यात ‘झी स्टुडिओ’चाच हातखंडा आहे. त्यामुळे त्यांनी ‘एफयू’ केला असता तर आनंद झाला असता. पण ‘झी’ने त्यांच्या वाहिनीवरून या चित्रपटाची जाहिरात किंवा प्रसिद्धी करण्यावरही र्निबध घालण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याबद्दल वाईट वाटते. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो, अशी भावना महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली. मांजरेकर सध्या चित्रिकरणासाठी मलेशियात आहेत. तिथून परतल्यावर याबद्दल पुढे काय करायचे ते ठरणार आहे.  मराठीतील प्रत्येक चित्रपट सध्या प्रसिद्धीसाठी ‘चला हवा येऊ द्या’ची वाट धरतो. त्याप्रमाणेच ‘एफयू’साठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. पण अजून त्याबद्दल वाहिनीकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही. चित्रपटाची जाहिरात वाहिनीवर करण्याबाबतही अद्याप काही सांगितले गेलेले नाही. मात्र अजूनही वाहिनीशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती चित्रपटाच्या वाहिनीवरील जाहिरातीचे काम सांभाळणाऱ्या ‘ओम अ‍ॅडव्हर्टायझिंग’चे हिमांशू सेठ यांनी दिली. तर ‘एफयू’ चित्रपट ‘झी स्टुडिओ’कडे नाही हे खरे असले तरी चित्रपटाच्या प्रसिद्धीसंदर्भात असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे ‘झी’च्या सूत्रांनी स्पष्ट केले.