प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो.
मनोज कुमार यांनी १९५५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैदान-ए-जंग’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९६४ मधील ‘शहीद’ चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळाली. यात त्यांनी शहिद भगत सिंगची भूमिका साकारली होती. ‘उपकार’  या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. त्यांनी अनेक देशभक्तीपर चित्रपटांची निर्मितीही केली. त्यामुळे  ते ‘भारत कुमार’ म्हणूनही ओळखले जातात. ‘उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान’, क्रांती, वो कौन थी या चित्रपटांसाठी मनोज यांना विशेष नावाजले जाते.
मनोज कुमार यांना १९७२ साली ‘बेईमान’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार आणि १९७५ मध्ये ‘रोटी कपडा और मकान’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर १९९२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.