एरव्ही ‘कान’सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय, मल्लिका शेरावत अशा तारका आणि अनुराग कश्यपसारखी दिग्दर्शक मंडळी यांचे चेहरे पाहण्याची आपल्याला सवय झाली आहे. पण, यंदाचा ‘कान’ महोत्सव मराठी जनांना सुखावणारा आहे, तो आपल्या कलाकाराची कान झेप पाहून. ‘विहीर’, ‘देऊळ’, ‘मसाला’ आणि ‘पुणे ५२’ अशा विविध चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची, लेखनाची मोहोर उमटवणाऱ्या गिरीश कुलकर्णीनेही खास निमंत्रणावरून ‘कान’ला हजेरी लावली आहे. अनुराग कश्यपच्या ‘अग्ली’ या चित्रपटात गिरीशची महत्त्वाची भूमिका आहे. ‘अग्ली’ कानमध्ये प्रदर्शित करण्यात आला असून त्याच्या प्रीमिअरसाठी टीमबरोबर गिरीश कुलकर्णीही कानच्या रेड कार्पेटवर उपस्थित झाला.
अनुराग कश्यपचा ‘अग्ली’ हा महत्त्वाकांक्षी चित्रपट कान महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. अपहरण नाटय़ावर आधारित या थरारपटात गिरीशबरोबर तेजस्विनी कोल्हापुरे आणि रोनित रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  गेल्या वर्षी ‘देऊळ’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या गिरीशला अनुरागने ‘अग्ली’ चित्रपटातील भूमिकेसाठी विचारणा केली. ‘अग्ली’ हा गिरीशचा पहिला हिंदी चित्रपट ठरणार असून तो भारतात प्रदर्शित होण्याआधीच कानसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकल्यामुळे एक सक्षम अभिनेता म्हणून गिरीशचे नाव जगभर पोहोचले आहे. गिरीशच्या या ‘कान’ झेपेने आंतरराष्ट्रीय महोत्सवाला झालेला मराठी स्पर्श मराठीजनांना खूश करून गेला आहे.