मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेता म्हणून अभिनेता प्रसाद ओकला ओळखले जाते. अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवणारा प्रसाद ओक सोशल मीडियावरही तितकाच सक्रीय असतो. तो विविध विषयांवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच प्रसाद ओक याने पत्नी मंजिरी ओकसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्याने मंजिरीचे कौतुक करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक ही एक व्यावसायिका आहे. ती नेहमी विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करत छोट्या उद्योजकांना मदत करत असते. पण आता तिच्या याच कामामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे यामुळे तिला एक मोठा गौरव प्राप्त झाला आहे. नुकतंच एका नथीला मंजिरी ओकचे नाव देण्यात येणार आहे. त्यामुळे ती नथ आता मंजिरी नथ म्हणून ओळखली जाणार आहे. प्रसाद ओकने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

प्रसाद ओकची पोस्ट

प्रिय मंजू, आज प्रचंड अभिमान वाटतोय तुझा. छोट्या छोट्या उद्योजकांना छोटीशी मदत व्हावी या निर्मळ उद्देशानी तू हे कोलॅबोरेशन वगैरे सुरु केलंस. या निरपेक्ष हेतूंचं फळ म्हणूनच कि काय…आज एका “नथी” ला तुझं नाव लागलंय. “मंजिरीनथ”.

आपल्या अनेक मित्र मैत्रिणींनी आपल्या पाठीमागे तुझी चेष्टा केली… तुझ्या so called जवळच्या मैत्रिणींपैकी एकीनेही तुझं कधीही कौतुक केलं नाही. पण या सगळ्या गोष्टींना मागे टाकत…या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तू आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते आहेस, याचा खूप अभिमान वाटतोय. खूप खूप खूप प्रेम, असे त्याने या पोस्टवर म्हटले आहे.

विशेष म्हणजे या पोस्टसोबत त्याने मंजिरीचा नथ घातलेला एक फोटोही शेअर केला आहे. त्याने बरेच हॅशटॅग वापरले आहे. त्यात फालतू लोकांकडे दुर्लक्षच कर असा हॅशटॅग वापरत प्रसाद ओकने तिला सल्लाही दिला आहे. सध्या प्रसाद ओकची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

प्रसाद ओकने लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त पत्नीला दिली ‘प्रेमाची भेट’, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रसाद ओकच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने ही पोस्ट आवडलीय, बाकी तुला व्हाईज नोट पाठवते, अशी कमेंट तिने केली आहे. तर अभिनेत्री क्रांती रेडकर हिनेही यावर फारच सुंदर अशी कमेंट केली आहे.