scorecardresearch

“हलाल सर्टीफाईड वस्तू…” शरद पोंक्षे यांची भारतीयांना कळकळीची विनंती

शरद पोंक्षे हे कट्टर सावरकरवादी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत

“हलाल सर्टीफाईड वस्तू…” शरद पोंक्षे यांची भारतीयांना कळकळीची विनंती
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

प्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या परखड राजकीय भूमिका मांडण्यासाठीही ओळखले जातात. शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. देशातील राजकीय घडामोडी, देशाचा इतिहास यावर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. बऱ्याचदा त्यांच्या या मतांवर टीकादेखील होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राहुल गांधींच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावर खरमरीत शैलीत एक पोस्ट शेअर केली होती.

शरद पोंक्षे हे कट्टर सावरकरवादी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत हे सर्वश्रुत आहे शिवाय ते त्यांच्या प्रत्येक भाषणातून हिंदू धर्माबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत असतात. नुकतंच त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून भारतात विकली जाणारी हलाल मान्य उत्पादनं आणि त्याचा आतंकवादाशी असलेला संबंध याबद्दल भाष्य केलं आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

आणखी वाचा : “मी पुरुष रूपातील राखी सावंत…” शिवम शर्माने सांगितलं ‘Splitsvilla’मध्ये पुन्हा हजेरी लावण्यामागील कारण

या व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणतात, “आपण बरीच उत्पादनं खरेदी करतो, त्यावरील काही उत्पादनांवर ‘हलाल’चा ठप्पा आपल्याला बघायला मिळतो. सगळ्याच उत्पादनांच्या बाबतीत नव्हे तर काही उत्पादनावर हा स्टॅम्प आपल्याला पाहायला मिळतो. जसं भारतात एखादी गोष्ट विकायची असेल तर आयएसआयचा मार्क असणं गरजेचं आहेच, तसंच इतर ५६ मुस्लिम राष्ट्रांत जर माल विकायचा असेल तर ‘हलाल’ सर्टिफिकेशनची सक्ती आता हळूहळू व्हायला सुरुवात झाली आहे.”

याविषयी अधिक माहिती देताना शरद पोंक्षे म्हणाले, “हलाल सर्टिफिकेट असलेली वस्तुच विकत घ्यायची असं भारतातील बऱ्याच मुसलमान संघटनांनी ठरवलं आहे. मॅकडॉनल्डने हे जाहीर केलं आहे की भारतातील त्यांचं प्रत्येक आऊटलेट हे हलाल सर्टिफाईड आहे. या ‘हलाल सर्टिफाईड’ उत्पादनातून मिळणारा पैसा हा इस्लामिक आतंकवादी संघटनांना मदत म्हणून वापरला जातो. त्यामुळे माझी विनंती आहे की हलाल सर्टिफिकेटच्या मागे कृपया लागू नका आणि माझा देश वाचवा.” असं म्हणत या व्हिडिओमधून शरद पोंक्षे यांनी आवाहनच केलं आहे.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या वादग्रस्त नाटकाने शरद पोंक्षे यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. हे नाटक आज सुरू नसलं तरी या अशा वेगवेगळ्या भाषणांच्या माध्यमातून शरद पोंक्षे हिंदू धर्माविषयी त्यांचे विचार मांडत असतात.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 13:26 IST

संबंधित बातम्या