मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्याच्या भूमिकांविषयी सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याची चॉकलेट बॉय म्हणून निर्माण झालेल्या ओळखीला तो छेद देण्याचा प्रयत्न करत असून सध्या विविधांगी भूमिकांची निवड करताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटातही तो थोडासा आगळ्यावेगळ्या रुपात दिसणार आहे.

श्रावणी देवधर दिग्दर्शित ‘मोगरा फुलला’ या आगामी चित्रपटात स्वप्नील वेगळ्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये स्वप्नील सुनील कुलकर्णी ही व्यक्ती साकारत आहे. त्याच्या या नव्या लूकचा फोटो निर्मात्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीदेखील स्वप्नीलच्या नव्या लूकचा फोटो शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.

‘मोगरा फुलला’ या चित्रपटातून एक प्रेमकथा उलगडली जाणार आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला सुनील कुलकर्णी लग्नाचे वय उलटून गेले तरी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहतो. पण एके दिवशी आपण प्रेमात पडल्याची जाणीव त्याला होते. तो जिच्या प्रेमात पडला आहे ती एक सुखवस्तू कुटुंबातील पण स्वतंत्र बाण्याची आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाची तरुणी आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने श्रावणी देवधर बऱ्याच काळानंतर दिग्दर्शन क्षेत्राकडे वळत आहेत. लपंडाव, सरकारनामा, लेकरू अशा मोजक्या पण दर्जेदार चित्रपट देणाऱ्या देवधर या आपल्या वेगळ्या शैलीसाठी ओळखल्या जातात.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे. यापूर्वी फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांची निर्मिती आणि ‘भिकारी’ चित्रपटाची प्रस्तुती ‘जीसिम्स’ने केली आहे.