Bharat Jadhav & Mahesh Manjrekar New Play : मराठी चित्रपट, मालिका व नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयानं स्वतःची एक वेगळी छाप पाडणारे अभिनेते म्हणजे भरत जाधव. अभिनयाबरोबरच त्यांनी निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले. मराठी रंगभूमीवर त्यांच्या ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘अस्तित्व’सारख्या नाटकांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता यात त्यांच्या आणखी एका नव्या नाटकाची भर पडणार आहे.
होय! हे खरे आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर भरत जाधव यांनी त्यांच्या नव्या नाटकाची घोषणा केली आहे. त्याबद्दल माहिती देणारी एक पोस्ट त्यांनी नुकतीच सोशल मीडियावर शेअर केली आहे. इतकंच नव्हे, तर या नव्या नाटकात त्यांच्यासह अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकरही असणार आहेत. तसेच टेलिव्हिजन आणि रंगभूमीवरील एक लोकप्रिय अभिनेत्रीसुद्धा या नाटकात असणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हे नाटक म्हणजे जणू एक पर्वणीच ठरणार आहे.
भरत जाधव व महेश मांजरेकर यांच्या नवीन नाटकाचे नाव आहे ‘शंकर जयकिशन’. या नाटकात भरत जाधव व महेश मांजरेकर या दोन दिग्गज अभिनेत्यांसह असणार आहे झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतली लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे.
सोशल मीडियावर एका खास व्हिडीओद्वारे भरत जाधव, महेश मांजरेकर व शिवानी रांगोळे यांच्या ‘शंकर जयकिशन’ या नव्या नाटकाची घोषणा करण्यात आली आहे. ‘शंकर जयकिशन’ नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे; तर दिग्दर्शन सुरज पारसनीस याने केले आहे. लवकरच हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भरत जाधव व महेश मांजरेकर यांच्या नवीन नाटकाचा व्हिडीओ
‘शंकर जयकिशन’ नाटकावर कलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
दरम्यान, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओवर मराठी कलाकार आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सोनाली खरे, सखी गोखले, सायली संजीव, सारंग साठ्ये, खुशबू तावडे, शिवराज वायचळसह अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्रेक्षकांनीसुद्धा यावर कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया देत उत्सुकता व्यक्त केली आहे. ‘कडक’, ‘कमाल’, ‘वाह वाह’, ‘आतुरतेने वाट बघतोय’ या आणि अशा अनेक कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.