अवघ्या काही दिवसांतच या वर्षाची सांगता होणार आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे वर्ष कसं काय सरसर निघून गेलं हाच प्रश्न अनेकांच्या मनात सध्या घर करु लागला आहे. त्यातही अनेकांच्या मनात रुखरुख आहे ती म्हणजे यंदाच्या वर्षी फसलेल्या संकल्पांची. नवीन वर्ष आणि हटके संकल्प हा जरी आता एक ट्रेंड बनला असला तरीही खूप कमी जणांचे संकल्प पूर्णत्वास जातात हेच खरे. काही कारणास्तव धकाधकीच्या आयुष्यात, रोजच्या धावपळीत सर्व काही निभावून नेताना कळत-नकळत या संकल्पांकडे दुर्लक्ष होतं. पण, तरीही सध्याच्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षासाठी कोणता संकल्प करायचा हा प्रश्न अनेकांच्याच मनात आल्यावाचून राहात नाही. आपल्या नवी वर्षांच्या संकल्पाबद्दल सांगतेय अभिनेत्री, दिग्दर्शिका क्रांती रेडकर.

मनातून सर्व नकारात्मक विचार दूर करून एक छान सकारात्मक जीवन जगण्याचा प्रयत्न मी पुढील वर्षी करणार आहे.  माझे काम आणि खासगी आयुष्य यात एकसूत्रीपणा आणण्याचा माझा संकप असेल. चालू वर्षी कामाच्या ओघात माझे शेड्यूल्ड खूप विस्कळीत झाले होते, त्यामुळे आगामी वर्षात या सर्व गोष्टींची मी पुरेपूर काळजी घेण्याचे ठरले आहे. तसेच नेहमीच्या त्याच त्याच भूमिकेच्या बाहेर जाऊन वेगळी भूमिका करण्याचा विचार मी येत्या २०१७  साली करणार आहे. मुळात त्यासाठी मी माझे प्रयत्न देखील सुरु केले आहेत. आगामी वर्षात ‘करार’ आणि ‘ट्रकभर स्वप्न’ या माझ्या दोन चित्रपटातील माझ्या भूमिका या खूप वेगळ्या आहेत. चाकोरीबद्ध भूमिकेतून बाहेर पडण्याचा माझा हा मानस आगामी वर्षात पूर्ण करेन. तसेच निर्मितीक्षेत्रातही विशेष काहीतरी करण्याची इच्छा आहे.