डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित वेडिंगचा शिनेमा या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणारी ऋचा इनामदार लवकरच डिजीटल क्षेत्रात पदार्पण करणार आहे. क्रिमिनल जस्टीस या वेबसीरिजमध्ये ती पहिल्यांदाच झळकणार आहे. या चित्रपटासोबतच तिच्या पदरात दोन जाहिरातीही पडल्या आहेत. त्यामुळे यंदाचा एप्रिल महिना ऋचासाठी खास असल्याचं सांगण्यात येत आहे. ऋचाचा ५ एप्रिल रोजी वाढदिवस असतो. त्यातच तिला मिळालेल्या या नव्या संधीमुळे यंदाचा वाढदिवस विशेष असल्याचं तिने सांगितलं.
“यावर्षीचा वाढदिवस माझ्यासाठी खूपच वेगळा असणार आहे. कारण तीन धमाल गोष्टी प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्यातील पहिली गोष्ट अशी की, ‘क्रिमिनल जस्टीस’नावाची वेबसिरीज केली आहे. ही वेबसीरिज बीबीसी आणि अप्लोस यांनी बनवली असून तिग्मांशू धुलिया यांनी दिग्दर्शित केली आहे. सिरीयस थ्रिलर, ड्रामा स्पेस आणि चांगला आशय असलेली ही वेबसीरिज आहे. ५ एप्रिलपासून तिचे एपिसोड हॉटस्टार स्पेशलमध्ये दाखवायला सुरुवात होणार आहे”,असं ऋचाने सांगितलं.
पुढे ती म्हणते, “दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अभिनेता शाहरूख खानबरोबर मी चित्रिकरण केलेल्या मित्सुबिशीच्या दोन जाहिराती याच सुमारास दाखविण्यास सुरुवात होणार आहे. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा ‘वेडिंगचा शिनेमा’ हा आगामी चित्रपट. या चित्रपटात परी आणि पक्याच्या लग्नाची गोष्ट आहे आणि त्यामध्ये असणारी परी मी साकारत आहे. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशा तीन वेगवेगळ्या माध्यमांमधून प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणं, याहून एका कलाकारासाठी चांगल गिफ्ट काय असू शकतं”.
व्यावसायिक चित्रपटाच्या पदार्पणातच ‘भिकारी’ या चित्रपटात ऋचाने मुख्य भूमिका केली होती, आणि आता १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातून ऋचा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भरपूर कौटुंबिक मनोरंजन देणाऱ्या या चित्रपटात मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, भाऊ कदम, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या बहुगुणी कलाकारांबरोबर शिवराज वायचळ या अभिनेत्यासोबत ऋचा स्क्रीन शेअर करणार आहे.
दरम्यान, डेन्टिस्ट्री पदवीचे शिक्षण घेत असतानाही अभिनयाची आवड जपत ऋचाने अभिनयाला सुरुवात केली. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना ऋचाने या क्षेत्रात तिच्या अभिनयाची एक वेगळी छाप पाडली. अनेक भाषिक भूमिका तिने चित्रपटांमध्ये साकारल्या आहेत. ऋचाच्या अभिनयाची सुरुवातच आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित फिचर फिल्मने झाली. याशिवाय अनेक मोठ्या कलाकारांसोबत नामवंत ब्रँड्सच्या सुमारे पन्नासपेक्षा जास्त जाहिरातीत ती झळकली आहे.