कलाविश्वामध्ये आता लग्नसराईचे वारे वाहू लागल्याचं हळूहळू दिसू लागलं आहे. काही दिवसांपूर्वी साखरपुडा करुन चर्चेत आलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिच्या घरी आता सनईचे सुरू घुमू लागले आहेत. शर्मिष्ठा लवकरच तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधणार असून तिने तिची लग्नपत्रिका सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ , बिग बॉस मराठी या लोकप्रिय कार्यक्रमातून चर्चेत आलेली शर्मिष्ठा लवकरच विवाहबंधनात बांधली जाणार आहे. जून महिन्यामध्ये शर्मिष्ठा आणि तेजस यांनी इगतपुरी येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीती साखरपुडा केला होता. त्यानंतर आता लवकरच ही जोडी लग्न करणार आहे. येत्या रविवारी, ११ ऑक्टोबर रोजी ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

“आपण सगळ्यांनी मला आणि तेजसला मनापासून स्वीकारलंत याबद्दल आम्ही दोघेही कायम तुमचे ऋणी आहोत. आता तुमच्या आणि वडिलजणांच्या आशीर्वादाने आम्ही ११.१०.२०२० रोजी लग्नाची गाठ बांधणार आहोत. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर सदैव राहोत. – शर्मिष्ठा आणि तेजस.”, अशी पोस्ट शर्मिष्ठाने शेअर केली आहे.

दरम्यान, शर्मिष्ठा राऊत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये शर्मिष्ठा झळकली असून तिची लोकप्रियता प्रचंड असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे साऱ्यांनाच तिच्या लग्नाविषयी उत्सुकता असल्याचं दिसून येतं.