71st National Film Awards Winner Treesha Thosar Video : ७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आज ( २३ सप्टेंबर ) नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. या सोहळ्यात अनेक दिग्गज उपस्थित होते. भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांचा यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सध्या या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये यंदा मराठी सिनेविश्वातील बालकलाकारांनी बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा रजत कमळ पुरस्कार यंदा ‘जिप्सी’ या मराठी चित्रपटासाठी कबीर खंदारे याला आणि ‘नाळ २’साठी त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांना विभागून प्रदान करण्यात आला. यांच्यात त्रिशा वयाने सर्वात लहान आहे. त्यामुळे या सोहळ्यात उपस्थित प्रत्येकाला या चिमुकलीचा खूप अभिमान वाटत होता.

चिमुकली त्रिशा ठोसर ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी नेसून आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर पोहोचली होती. यावेळी तिने हात जोडून नमस्कार करत सर्वप्रथम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अभिवादन केलं. त्यांनी सुद्धा या चिमुकलीची कौतुकाने पाठ थोपटली आणि त्रिशाला यंदाचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ऑफ व्हाइट रंगाची सुंदर साडी, त्यावर फुल स्लिव्हज असलेला ब्लाऊज, नाजूक कानातले, कपाळावर छान टिकली या लूकमध्ये त्रिशा खूपच गोड दिसत होती. त्रिशाला पाहताच सर्वांनी जल्लोष करत तिचं कौतुक केलं आणि यापुढे असंच अभिमानास्पद काम करत राहा असं सांगत तिला प्रोत्साहन दिलं.

त्रिशाचे पुरस्कार सोहळ्यातील गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आता ही चिमुकली लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या बहुचर्चित सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये त्रिशाचा अभिनय प्रेक्षकांना खूप जास्त आवडलाय. याशिवाय नुकतीच त्रिशा सिद्धार्थ जाधवची प्रमुख भूमिका असलेल्या ‘आतली बातमी फुटली’ या सिनेमात सुद्धा झळकल्याचं पाहायला मिळालं.