Vivek lagoo Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांच्या निधनानंतर कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला होता. रंगीभूमीवरून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. अभिनयाबरोबरच संगीतातही त्यांना विशेष रुची होती. त्यामुळेच लेखक व संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे.
विवेक लागू यांची मुलगी मृण्मयी सुद्धा दिग्दर्शक व लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजच्या घडीला मृण्मयी यशस्वी लेखिका देखील आहे. तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेल्या ‘थप्पड’ सिनेमाच्या लेखकांच्या टीमचा मृण्मयी एक भाग होती. तसेच ‘स्कूप’ सारख्या गाजलेल्या प्रोजेक्टची लेखिका म्हणून देखील मृण्मयीने ओळख मिळवली आहे. वडिलांच्या निधनानंतर मृण्मयीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
“आम्ही बराच काळ एकत्र लढलो पण, आता प्रेम आणि कृतज्ञतेने निरोप घेण्याची वेळ आली आहे. माझे बाबा! माझे खूप चांगले मित्र, माझे मार्गदर्शक, माझे नंबर वन फॅन होते… तुमच्या सगळ्या गोष्टी कायम स्मरणात राहील. तुमची खूप आठवण येईल बाबा… तुम्ही एका मुलीसाठी सर्वोत्तम बाबा होतात.” अशी भावनिक पोस्ट शेअर करत मृण्मयीने वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. या पोस्टसह अभिनेत्रीने तिच्या बाबांबरोबरचा फोटो देखील शेअर केला आहे.
दरम्यान, विवेक लागू यांच्या ‘व्हॉट अबाऊट सावरकर’, ‘अग्ली’, ‘३१ दिवस’, ‘गोदावरीने काय केले’ या कलाकृती प्रचंड गाजल्या होत्या. मराठी नाटक व सिनेमांबरोबरच ‘चार दिवस सासूचे’, ‘हे मन बावरे’ या गाजलेल्या मालिकांमध्येही विवेक लागू यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी सिनेविश्वातील कलाकार, त्यांचे चाहते दु:ख व्यक्त करत आहेत. विवेक लागू यांच्या पार्थिवावर आज ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.