केतकी माटेगावकर हिने ‘शाळा’ चित्रपटात काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवली. पण, त्याआधी ती लहान असताना तिला अनेकांनी कार्यक्रमांमध्ये गाताना पाहिलं होतं. तिला चित्रपटात काम करताना पाहून अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. तिच्या गण्याबरोबरच तिच्या अभिनयाचेही सर्वजण चाहते झाले. तर आता तिने तिच्या कामाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
केतकी लवकरच पुन्हा एकदा एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अंकुश असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. तर या चित्रपटाच्या निमित्ताने ‘तारांगण’ला दिलेल्या एका मुलाखतीत ती पैसा आणि प्रसिद्धीसाठी कधीही काम करत नाही असं म्हणाली आहे.
ती म्हणाली, “ज्या प्रोजेक्टमध्ये किंवा ज्या कामांमध्ये शंभर टक्के खात्री वाटते असेच प्रोजेक्ट करण्यात अर्थ आहे. नुसता पैशांचा विचार करून किंवा दिसत राहायचं म्हणून काम कराव असं मला कधीही वाटत नाही. कारण मला ती माझी जबाबदारी वाटते. आतापर्यंत मला रसिक मायबाप प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालं आहे, मला त्याला जागायचं आहे. मला कुठेही त्यांना निराश करायचं नाही. त्यामुळे मी खूप विचारपूर्वक काम घेते आणि त्यात माझा शंभर टक्के देते.” तर आता केतकीच्या या बोलण्याचं कौतुक होत आहे.