अभिनेत्री मृणाल कुलकर्णी या मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. गेली अनेक वर्षं त्या विविध माध्यमांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या फिटनेसमुळेही नेहमीच चर्चेत असतात. तर आता त्यांनी त्यांचं फिटनेस सिक्रेट सांगितलं आहे.
मृणाल कुलकर्णी लवकरच ‘सुभेदार’ या चित्रपटात जिजाबाईंची भूमिका साकारताना दिसणार आहेत. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या चित्रपटाची टीम या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. याच निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’मध्ये हजेरी लावली. यावेळी मृणाल कुलकर्णी यांनी त्यांच्या फिटनेसचं रहस्य उघड केलं.
आणखी वाचा : मृणाल कुलकर्णी यांनी खाल्ले होते तळलेले किडे, अनुभव शेअर करत म्हणाल्या, “त्याची चव…”
“तुमच्या फिटनेसचं रहस्य काय?” असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “शिवराज अष्टकाचा भाग झालं की फिट रहायलाच लागतं. दुसरा काही पर्याय नाही. दिग्पाल पहाटे साडेतीन वाजता उठवतो काय, एखादाच सीन का होईना पण तलवारबाजीचा देतो, त्याचा सराव करायला लावतो. अजून पुढचे तीन चित्रपट होईपर्यंत तर फिटनेस ठेवायलाच लागणार आहे. पण गमतीचा भाग सोडला तर आपल्या सर्वांनाच आपल्या फिटनेसचं रहस्य माहित असतं. जे करायला हवं ते करायचं आणि जे करायला नको ते नाही करायचं म्हणजे तुम्ही फिट राहता.”
दरम्यान, त्यांचा सुभेदार हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी यांच्याबरोबरच चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, दिग्पाल लांजेकर, विराज कुलकर्णी, शिवानी रांगोळे, स्मिता शेवाळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.