मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाबरोबर ती उत्तम कवयित्री, नृत्यांगना आणि निवेदक सुद्धा आहे. एवढंच नाही तर ती एक चांगली व्यावसायिका सुद्धा आहे. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीने काल (९ मे) काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये प्राजक्ता काही कागदपत्रावर सही करताना दिसत होती. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. प्राजक्ताने नवं घर घेतल्याच्या वावड्या उठल्या. पण आता प्राजक्ताच्या त्या फोटोमागचं सत्य समोर आलं आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं स्थान असणारे पॅनोरमा स्टुडिओज आणि प्राजक्ता माळी यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘फुलवंती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच संदर्भातील कागदपत्रावर सही करतानाचे फोटो प्राजक्ताने शेअर केले होते. आज अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्राजक्ताच्या ‘फुलवंती’ चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

हेही वाचा – Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम ज्ञानदा रामतीर्थकरने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दिलं चाहत्यांना सरप्राइज, काय ते? पाहा…

‘फुलवंती’ ही भव्य कलाकृती पॅनोरमा स्टुडिओजची आजवरची सर्वात मोठी मराठी चित्रपट निर्मिती ठरणार असून अभिनेत्री प्राजक्ता माळी यानिमित्ताने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचं लेखन-संवाद प्रवीण विठ्ठल तरडेंनी लिहिले आहेत. तर दिग्दर्शन त्यांची पत्नी स्नेहल प्रवीण तरडे करीत आहेत. पखवाज आणि घुंगरांची रंगणारी जुगलबंदी रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर

कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी आणि प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रसिद्ध छायाचित्रणकार महेश लिमये यांनी छायाचित्रणाची तर संगीताची जबाबदारी अविनाश-विश्वजीत यांनी सांभाळली आहे. मंगेश पवार अँड कं आणि शिवोहम क्रिएशन्स प्रा.लि.निर्मित ‘फुलवंती’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली, “‘फुलवंती’ सारखी दर्जेदार साहित्यकृती माझ्याकडे आल्याने मी निर्माती म्हणून एक भव्य कलाकृती करण्यास तयार झाले. यासाठी पॅनोरमा स्टुडिओजने मला भक्कम पाठिंबा दिला, त्यातून माझा आत्मविश्वास उंचावला. ‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांना उत्तम कलाकृती देऊ शकेन, असा विश्वास मला आहे. दर्जेदार संहिता आणि उत्तम कलावंत यामुळे चित्रपटाच्या बरोबर आम्ही भक्कमपणे उभे असल्याचे पॅनोरमा स्टुडिओजचे मॅनेजिंग डिरेक्टर कुमार मंगत पाठक यांनी सांगितले.”