Marathi Actress Education : मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार उच्चशिक्षित आहेत. काही कलाकारांनी इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे तर, बहुतांश कलाकार डॉक्टर, वकील सुद्धा आहेत. उच्चशिक्षित असूनही कलेच्या प्रेमापोटी, अभिनयाची आवड म्हणून या कलाकारांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. नुकताच एका लोकप्रिय अभिनेत्रीने याविषयी खुलासा केला. मालिकाविश्वामुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या शिक्षणाविषयी खुलासा केला आहे. याबद्दल जाणून घेऊयात…

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे स्वानंदी टिकेकर. स्वानंदी ही प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय संगीत गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. तिने कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिच्याकडे मास्टर्स डिग्री आहे. मात्र, अभिनयाची आवड असल्याने तिने Law प्रोफेशन सोडून इंडस्ट्रीत करिअर करण्याचा निर्णय घेतला.

स्वानंदी टिकेकर राजश्री मराठीच्या मुलाखतीत म्हणाली, “मी शाळेत असल्यापासून विविध नाटकांमध्ये सहभागी व्हायचे. पुण्यात तर या सगळ्या स्पर्धांचा इतका उत्साह असतो की, मी पूर्णवेळ नाटकात काम करायचे. अर्थात हे सगळं सांभाळून अभ्यास सुद्धा केला. माझं Law पूर्ण झालंय, माझं Law मध्ये मास्टर्स झालंय. मी कोर्टात प्रॅक्टिस सुद्धा केलीये. ॲडव्होकेट अभय आपटे हे पुण्यातील सुप्रसिद्ध वकील आहेत, त्यांच्याकडे मी असिस्टंट म्हणून काम करत होते. यानंतर मला ‘मास्टर ऑफ सायन्स ग्लोबल अफेअर्स’साठी न्यूयॉर्कच्या महाविद्यालयात प्रवेश सुद्धा मिळाला होता. पण, मी गेले नाही. न्यूयॉर्कला जेव्हा जायचं होतं…तीच वेळ माझ्यासाठी निर्णय घेण्याची होती. अभिनय की Law प्रोफेशन? मग तेव्हा मी इथे भारतात थांबण्याचा निर्णय घेतला.”

याबद्दल स्वानंदीने काही वर्षांपूर्वी ‘दिल के करीब’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता. ती म्हणाली होती, “न्यूयॉर्क विद्यापीठात माझी प्रवेश प्रकिया पूर्ण झाली होती. व्हिसा वगैरे सगळं काही पूर्ण झालं होतं आणि त्याच काळात मी ‘प्राईजटॅग’ नावाचं नाटक करत होते. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये माझं बाहेरगावी जायचं निश्चित झालं आणि याचदरम्यान मला नाटकासाठी ‘झी गौरव’चा पुरस्कार मिळाला. मग इथेच थांबण्याचा निर्णय घेतला.”

स्वानंदी पुढे म्हणाली, “माझ्या आई-बाबांनी या सगळ्या गोष्टी पाहून मला सांगितलं होतं की, हे बघ आम्ही सुद्धा एक कलाकार आहोत. अभिनय करून आम्ही आनंद मिळवला आणि लोकांना तो आनंद दिला. तुझ्याकडे सुद्धा हा पर्याय उपलब्ध आहेत. भविष्यात तिकडे गेल्यावर तुला वाटेल…आपण अभिनय क्षेत्रात करिअर केलं हवं होतं. त्यामुळे आताच या गोष्टींचा विचार कर… यानंतर खूप विचार केल्यावर मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग निवडला.”, असं स्वानंदीने सांगितलं.