Aishwarya Narkar & Avinash Narkar : ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्याकडे मराठी मनोरंजनविश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सध्या हे दोघं ‘शेवग्याच्या शेंगा’ या नाटकात काम करत आहेत. मात्र, अविनाश सध्या टेलिव्हिजनवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ आणि ‘तारिणी’ या दोन मालिका तसेच ‘शेवग्याच्या शेंगा’ आणि पुरुष या नाटकांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. एकाचवेळी ४ प्रोजेक्ट सांभाळून काम करणं ही फारच मोठी गोष्ट असते. त्यातही नाटकाला आलेल्या प्रत्येक चाहत्याला ते त्याच आपुलकीने भेटतात. म्हणूनच ऐश्वर्या नारकरांनी खास पत्र लिहून पतीचं भरभरून कौतुक केलं आहे.

ऐश्वर्या नारकरांचं अविनाश यांच्यासाठी खास पत्र

प्रिय अवि,
तू माझं Inspiration आहेस. मी रोज काहीतरी तुझ्याकडून नवीन शिकत आले आहे. तुझं तुझ्या कामावर असलेलं प्रेम, जगण्यातली, काम करण्यातली जिद्द, सतत हसरा चेहरा या सगळ्यातच तुझ्या जगण्याचं रसायन दडलेलं आहे. गेले काही दिवस तुला पुरेसा आराम मिळत नाहिये.. खूप धावपळ होतेय.. तरी देखील तू तेवढ्याच जिद्दीने काम करतोयस. दोन मालिका आणि दोन नाटकं करतोयस पण, तुला दिवसाअखेरी कधीच थकलेलं बघितलं नाही मी!!

२७ सप्टेंबरला आपल्या ‘शेवग्याच्या शेंगा’ नाटकाचा शुभारंभ पुण्यात पार पडला. त्या दिवशी तू सलग तीन प्रयोग न थकता आणि Full Energy ने केलेस आणि शेवटच्या प्रयोगानंतर प्रेक्षकांशी भेटताना तेव्हढ्याच हसतमुख चेहऱ्याने भेटलास. अगदी परवा सुद्धा पुण्यातला दुपारी १२:१५ चा आपला शेवग्याच्या शेंगाचा प्रयोग करून मुंबईला प्रवास आणि रात्री साडेआठ वाजता पुरुष नाटकाचा प्रयोग केलास!

रात्री उशिरा घरी येऊन पुन्हा शूटसाठी पहाटे घर सोडलंस आणि नंतर दादरला आपला ‘शेवग्याच्या शेंगा’चा प्रयोग होता…कसं जमतं रे तुला? इतकी ताकद कुठून येते तुझ्यात?

सहकलाकार म्हणून काम करताना तुझा अभिमान वाटतोच पण तुझी बायको असण्याचा अभिमान त्याही पेक्षा जास्त आहे. तुझे कष्ट, तुझी जिद्द, तुझं प्रेम, तुझी स्वप्नं इतक्या जवळून मला अनुभवता येतंय यापेक्षा अजून काय हवं आयुष्यात?

खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतो. तू ज्या ताकदीने काम करतोयस मलाही त्याच ताकदीने काम करता येऊदे
खूप खूप प्रेम…

तुझी,
पल्लू …

दरम्यान, ऐश्वर्या यांनी लिहिलेल्या या सुंदर पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “किती छान दोघेही असेच कायम राहा”, “आमच्या मनातलं लिहून काढल्याबद्दल खूप खूप आभार! ऐश्वर्या मॅम हे खरंच खूप कठीण आहे”, “दोघांना खूप प्रेम”, “अविनाश सर आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.