Ajinkya Deo on misconceptions about him: अजिंक्य देव यांनी ‘शाबास सुनबाई’, ‘माहेरची साडी’, ‘सर्ज्या’, ‘जिवा सखा’, ‘वासुदेव बळवंत फडके’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

अजिंक्य देव यांनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की तुझा आवाज चांगला आहे, तर कधी तुला व्हॉइस ओव्हर किंवा डबिंगच्या ऑफर्स आल्या का?

अजिंक्य देव यावर म्हणाले, “मला ऑफर्स आल्या नाहीत. माझ्याबाबतीत एक गोष्ट खूप प्रमाणात झाली आहे. गैरसमज पसरवले गेले किंवा कदाचित मी जसा आहे, त्यामुळे लोकांनी स्वत:च माझ्याबद्दल एक मत तयार करुन घेतलं.”

“मला अनेकजण असे म्हणाले…”

“मला असे वाटते की असे मत तयार करण्यापेक्षा मला फोन करून बोलले असते तर आनंद झाला असता. यामुळेच माझ्या हातातून असे खूप चित्रपट गेले. लोक माझ्याबद्दल असा विचार करायचे की त्याचे थाटच वेगळे आहेत. तो म्हणजे दुसऱ्याच जगात असतो. माझ्याबद्दल खूप गैरसमज निर्माण झाले, करण्यात आले. मला भेटल्यानंतर, माझ्याशी बोलल्यानंतर मला अनेकजण असे म्हणाले अमुक अशा चित्रपटात तुम्हालाच घेणार होतो. पण आम्हाला असं सांगितलं की तुम्ही फार तिरसट आहात. मी त्यांना म्हणायचो की मला एक फोन करायचा. मी सर्वांशी बोलतो. तर इंडस्ट्रीमध्ये माझ्याबद्दलचा गैरसमज खूप निर्माण झाला.”

पुढे अजिंक्य देव म्हणाले, “दुसरी गोष्ट अशी की आई बाबांचं वलय नेहमी मागे राहिलं. त्या वलयामुळे अनेकांना असंही वाटलं की त्याला कसं विचारायचं. मग व्हॉइस ओव्हरसाठी अजिंक्य देवला कसं विचारायचं? असं लोकांना वाटलं असेल. त्यामुळे कुठेतरी लोकांनी केलेल्या गैरसमजामुळे माझं खूप नुकसान झालं. नुकसान झालं, फायदा झाला, असं म्हणणार नाही. पण, काम करण्यासाठी विविध क्षेत्र आहेत, त्यामध्ये खूप काही करता आलं असतं आणि विशेष म्हणजे मी ते करण्यासाठी तयार होतो.”

“नसते गैरसमज आणि नको त्या गोष्टी यामुळे हे सर्व घडले. आपल्या इथे ती समस्या आहेच की कोणी काहीतरी सांगायचं, मग ते सगळीकडे पसरत जातं. त्यानंतर लोक विचारत नाहीत. त्यानंतर जे भेटले, बोलले ते म्हणायचे की आम्ही जसं तुमच्याबद्दल ऐकलं तसे तुम्ही नाही. मग त्यांना म्हणायचो की मी तसाच नाही.

दरम्यान, याच मुलाखतीत अजिंक्य देव यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलही वक्तव्य केले. बिग बींचा त्यांच्यावर प्रभाव असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवदेखील सांगितला. आता आगामी काळात ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.