Ajinkya Raut Talks About Chhatrapati Shivaji Maharaj : अजिंक्य राऊत मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या तो ‘अभंग तुकाराम’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यामध्ये अजिंक्य छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. अशातच त्याने आता याबद्दलचा त्याचा अनुभव सांगितला आहे.

अजिंक्यने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच आता तो पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे. त्याने नुकतच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितलं आहे.

अजिंक्य राऊचती प्रतिक्रिया

अजिंक्य मुलाखतीत म्हणाला, “खूप ऋणी आहे मी यासाठी. जेव्हा आपल्याला देवाची कृपा जाणवते आणि आपण किंवा आपल्या पूर्वजांनी काही तरी योग्य काम केलं असावं, ज्यामुळे आपली यासाठी निवड होतेय असं वाटतंय.” अजिंक्यने पुढे चित्रपटासाठी त्याला विचारणा झाली तेव्हा काय प्रतिक्रिया होती याबद्दल सांगितलं आहे. याबद्दल अजिंक्य म्हणाला, “मला असं वाटतं होतं की मला दिग्पाल लांजेकरांबरोबर काम करायचं आहे आणि तेवढ्यात मला त्यांचा फोन आला आणि तेव्हा मी आधी त्यांना धन्यवाद म्हटलं.”

अजिंक्य पुढे म्हणाला, “त्यांनी मला हेच सांगितलं की माझी इच्छा आहे तू करावंस, त्यानंतर त्यांनी त्याबद्दल सगळं सांगितलं आणि त्यांचा मोठेपणा की त्यांनी मला म्हटलं की तू ठरव तुला करायचं आहे की नाही. तेव्हा मी म्हटलं चांगल्या कामासाठी उशीर कशाला? मला करायचं आहे असं म्हणत फोन ठेवला. पण, फोन ठेवल्यानंतर मी विचार केला की, आपण करायचं म्हणतोय खरं, पण आजच्या तारखेला अशी भूमिका साकारणं ज्याची दखल घेतली जाणार; समीक्षकांकडून प्रतिक्रिया येणार, त्यामुळे आपल्याला ते झेपणार आहे का? कारण विचारणा झाल्यानंतर लगेच ४-५ दिवसांत शूटिंग करायचं होतं.”

अजिंक्य राऊतने सांगितला अनुभव

अजिंक्य पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचा अनुभव सांगत म्हणाला, “मी पूर्वी काही मालिकांमध्ये सातत्याने जर काही रडण्याचा सीन असेन तर ग्लीसरीन वापरायचो, पण या सेटवरचं वातावरण, गांभीर्य आणि मी त्या कपड्यांमध्ये जेव्हा स्वत:ला अनुभवलं, जिरेटोप बघितला तेव्हा माणूस दंग झालो आणि तेव्हा सतत डोळ्यात पाणी होतं आणि आतून गलबलायला होत होतं की हे काय घडतंय; तेव्हा ज्या गोष्टी घडत होत्या तो वेगळा अनुभव होता. मी मनापासून एक एक सीन केला आहे.”