Alka Kubal Shares Anecdote of Nilu Phule: एकापेक्षा एक खलनायकाच्या भूमिका साकारत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले, ज्यांनी मराठी सिनेसृष्टीत महत्त्वाचे योगदान दिले, ते म्हणजे दिवंगत अभिनेते निळू फुले. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेते म्हणून निळू फुले यांची ओळख आहे.

अनेक कलाकार आजही त्यांच्या आठवणी सांगतात. नुकतीच अलका कुबल यांनी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी निळू फुले यांच्याविषयी एक आठवण सांगितली. एका सीनचा किस्सा त्यांनी सांगितला. अलका कुबल नेमकं काय म्हणाल्या, हे जाणून घेऊ…

निळू भाऊंना चिखलाने माखलेल्या…

या मुलाखतीत अलका कुबल यांना विचारले की, निळू फुलेंबरोबरची अशी कोणती आठवण आहे की तू कायम जपून ठेवली आहेस? यावर अलका कुबल म्हणाल्या, “निळू भाऊ जरी खलनायकाच्या भूमिका करत होते, तरी त्यांचं वाचन दांडगं होतं, त्यांचं बोलणं एवढं छान होतं की ऐकत राहावसं वाटायचं. जेव्हा त्यांना कळलं की मी बाबुराव मुंबरकर यांची नात आहे. बाबुराव मुंबरकर हे आईचे काका होते, तर निळू भाऊ हे बाबुराव मुंबरकर यांचे मित्र होते. त्यानंतर ते माझ्याशी अधिक जोडले गेले.”

अलका कुबल पुढे म्हणाल्या, “आम्ही सतीश रणदिवेंचा ‘रिक्षावाली’ चित्रपट करत होतो. मी हा किस्सा सगळीकडे सांगते. अगदी वडिलांसारखे माया करणारे असेच निळू भाऊ मला आठवत होते. तर त्या चित्रपटातील शेवटचा सीन असा होता की, मला निळू भाऊंना चिखलाने माखलेल्या चपलेने थोबाडीत मारायची होती, माझी हिंमतच होत नव्हती. तेव्हा मी काही तितकी प्रोफेशनल झाले नव्हते, तो माझा १२ वा किंवा १४ वा चित्रपट असेल.”

“माझा हात त्यांच्या गालापर्यंत जायचा, पण मी मारायचे नाही, त्यामुळे खूप रिटेक झाले. सगळ्यांच्या लक्षात आलं की ही निळू भाऊंना चप्पल मारायला काही कबूल नाही. निळू भाऊंनी मला थांबवलं. चित्रपटात चिखलाने माखलेला ठसा गालावर पाहिजे होता, म्हणून ते मारणं गरजेचं होतं.”

“निळू भाऊ मला बाजूला घेऊन गेले. ते मला म्हणाले की, अलका अगं तू ज्युनिअर आहेस, मी खूप सिनिअर आहे हे डोक्यातून काढून टाक. मी मार खाण्याचे पैसे घेतोय, तू मारण्याचे पैसे घेतेस असं समज. एवढं कर. एक चांगली अभिनेत्री म्हणून हा शॉट दे. त्यांनी इतका धीर दिल्यामुळे तो शॉट खूप छान झाला. निळू भाऊंनी त्या सीननंतर मस्त शॉट दिलास असं म्हणत मला शाबासकी दिली. असे कलाकार असतात, ज्यांच्यामुळे आम्ही घडत असतो”, अशी आठवण अलका कुबल यांनी सांगितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, निळू फुले यांचे २००९ साली निधन झाले. अलका कुबल नुकत्याच ‘वजनदार’ या नाटकातून रंगभूमीवर परतल्या आहेत. या नाटकात आई कुठे काय करतो या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिषेक देशमुख हा अभिनेतादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.