‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गणपती बाप्पाचं गाणं सोशल मीडियावर तुफान हिट झालं होतं. या गाण्यावर बालकलाकार साईराज केंद्रेने एक रील व्हिडीओ बनवला होता, जो सर्वत्र व्हायरल झाला होता. साईराजचे गोंडस व निरागस हावभाव पाहून सगळेच थक्क झाले होते. या गाण्यामुळे त्याला घराघरांत लोकप्रियता मिळाली आणि हा चिमुकला रातोरात स्टार झाला.

साईराज यानंतर बालकलाकार म्हणून अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये झळकला. याशिवाय ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत भूमिका साकारण्याची त्याला संधी मिळाली. या मालिकेत त्याने अप्पीच्या मुलाचं सिंबा ( अमोल अर्जुन कदम ) हे पात्र साकारलं होतं. मालिका संपून आता अनेक महिने उलटून गेले असले तरी साईराजने साकारलेल्या सिंबाची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे.

साईराजचं सोशल मीडिया अकाऊंट सुद्धा आहे. हे अकाऊंट त्याचे आई-वडील सांभाळतात. यावर एक नुकतीच आनंदाची बातमी शेअर करण्यात आली आहे. साईराज आता लवकरच एका मराठी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे.

साईराजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नुकतंच ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या सिनेमाचं पहिलं पोस्ट शेअर करण्यात आलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे करणार असून यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, सचिन खेडेकर, प्राजक्ता कोळी, अमेय वाघ, क्षिती जोग, कादंबरी, पुष्कराज, हरीश दुधाडे यांसारखे प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत.

sairaj
साईराज केंद्रे आता मराठी सिनेमात झळकणार…

मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या सिनेमातून अधोरेखित करण्यात येणार आहे. चिमुकल्या साईराजची चित्रपटात वर्णी लागल्यावर नेटकऱ्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा सिनेमा पुढच्यावर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.