Amruta Khanvilkar Gives Health Tips : अमृता खानविलकरला मराठी कलाविश्वाची ‘चंद्रमुखी’ म्हणून ओळखलं जातं. अभिनेत्रीने मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीत सुद्धा स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेली अनेक वर्षे अमृता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या काळात अभिनेत्रीने तिचा फिटनेस सुद्धा उत्तमप्रकारे जपला आहे. अमृताचा अभिनय, डान्स, तिची स्टाइल, तिचा फिटनेस याबद्दल नेहमीच चर्चा होत असते.

अभिनेत्री युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तिच्या लाइफस्टाइलबद्दलच्या अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करते. अमृताने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिची दिनचर्या नेमकी कशी असते, PCOD झाल्यावर अमृताने आपल्या दिनचर्येत कसा बदल केला याची माहिती चाहत्यांना दिली आहे. याशिवाय उपवास केल्याने शरीराला कसा फायदा झाला हे सुद्धा अभिनेत्रीने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

अमृता खानविलकर म्हणते, “उपवास करायचा की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. त्यामुळेच मी हा आजचा व्हिडीओ तुम्हा सर्वांबरोबर शेअर करतेय. फास्टिंग केल्यामुळे आपल्या शरीराला कसा फायदा होतो, माझी दिनचर्या नेमकी कशी असते आणि फास्टिंगमुळे मला कसा फायदा झाला. याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. जवळपास ८ ते १० वर्षांपूर्वी मला PCOD झाल्याचं समजलं. त्यानंतर मला संपूर्ण जीवनशैली बदलावी लागली. या सगळ्यात प्रामुख्याने जेवणाच्या वेळेत बदल करावा लागला. त्यानंतर मी योगा करू लागले आणि हळुहळू मला फास्टिंग आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची जाणीव झाली.”

अभिनेत्री पुढे सांगते, “रात्रीचं जेवण ते सकाळचा नाश्ता…यामध्ये तुम्ही किती अंतर ठेवता हे फार महत्त्वाचं असतं. मला माझ्या आहारतज्ञांनी सांगितलं होतं की, रात्रीचं जेवण काहीही करून तुला ७ ते ७:३० पर्यंत जेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी तुला ७ वाजल्यानंतरच खायचं आहे. यादरम्यान, मी पाणी, ग्रीन टीचं सेवन करते. सुरुवातीला संध्याकाळी ७ ते सकाळी ७ असे १२ तास मी काहीच खायचे नाही…ती वेळ आता वाढलीये…मी आता जवळपास १६ तास तरी काहीच खात नाही. माझ्या रात्रीच्या जेवणाची वेळ आता फारच लवकर असते. मी साधारण ६ ते ६:३० वाजता जेवून मोकळी होते. त्यानंतर ब्लॅक कॉफी पिते किंवा चिया सीड्स विथ लेमन वॉटर पिते. मध्ये १६ तासांचा वेळ गेल्यावर सकाळी मी व्यवस्थित नाश्ता करते…तुम्ही त्याला जेवणही बोलू शकता. फास्टिंगचे विविध प्रकार आहेत १२ तास, १४ तास, १६ तास किंवा महिन्यातून एकदा मी पूर्ण २४ तास उपवास करते.”

“मला वैयक्तिक आयुष्यात याचा खूप जास्त फायदा झालाय. मी आयुष्यात प्रचंड शांत झालेय, वजन नियंत्रित राहिलं, फास्टिंग काळात मी सर्वात जास्त पाणी पिऊ लागले, यामुळे पचनसंस्थेला पूर्ण आराम मिळतो, सतत मनात जेवणाचा विचार येत नाही. असे सगळे अनेक बदल माझ्या आयुष्यात झाले. तुम्ही सुद्धा अशाप्रकारचं फास्टिंग करू शकता. फक्त सुरुवात १२ तासांच्या फास्टिंगपासून करा. रात्री ७-८ पर्यंत जेवलात…की १२ तासांनंतर सकाळी व्यवस्थित नाश्ता करायचा. या १२ तासांच्या वेळेत आवळा शॉट, तूप-पाणी ( १ ग्लास पाण्यात एक चमचा तूप ), ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, निंबू पाणी ( साखरेशिवाय ) या पेयांचं सेवन तुम्ही करू शकता. मला या दिनचर्येचा प्रचंड फायदा झाला.” असं अमृताने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं.