Amruta Khanvilkar shares video of Badarinath Dham: अभिनेत्री अमृता खानविलकरने आतापर्यंत अभिनय, नृत्य, रिअॅलिटी शोची परीक्षक अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.
सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ, पोस्ट शेअर करत ती अनेकदा तिच्या व्यावसायिक, तसेच खासगी आयुष्याबाबत व्यक्त होताना दिसते. नुकतीच अमृता केदारनाथ यात्रेला गेली होती. तेथील व्हिडीओ आणि फोटो शेअर करीत तिचा आनंद तिने व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. आता तिने सोशल मीडियावर आणखी व्हिडीओ शेअर करत तेथील अनुभव सांगितला आहे.
“मी खूप आनंदी आहे”
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अमृता म्हणते, “आम्ही आता बद्रीनाथला चाललोय. माझे पाय आता आपोआप चालत आहेत. माझा माझ्या पायांवर काहीच कंट्रोल नाही. माझे पाय खूप दुखत आहेत. तरीही चालत आहेत.”
पुढे अभिनेत्रीने बद्रीनाथचे दर्शन झाल्याचेदेखील सांगितले. त्याबरोबरच तेथील मंदिर तसेच आजूबाजूचा परिसरदेखील तिने या व्हिडीओच्या माध्यमातून दाखवला. अमृता म्हणाली, “चारधाममधील पहिल्या धामाचं दर्शन झालं आहे. मी खूप आनंदी आहे.” अमृताने तिथे केसर दूध आणि जिलेबीचा आस्वाद घेतल्याचेदेखील पाहायला मिळाले.
हा व्हिडीओ शेअर करताना अमृता खानविलकरने लिहिले, “माझ्या आयुष्यातील पहिलं धाम. एक अनुपम आशीर्वाद. आयुष्याच्या सगळ्या दोऱ्या त्याच्याच हातात असतात, हे यात्रेतून समजलं. बद्रीनाथचं दर्शन म्हणजे एक पवित्र संकेत आहे. ही एका नव्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे.” असे लिहीत अभिनेत्रीनं तिच्या भावना व्यक्त केल्या. तसेच प्राजक्ता माळीला टॅग करीत तिने तिचे आभारदेखील मानले आहेत. प्राजक्ता माळी व अमृता खानविलकर यांनी केदारनाथ यात्रा एकत्र पूर्ण केली.
अमृताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. नेटकऱ्यांनी ‘हर हर महादेव’ अशा स्वरूपाच्या अनेक कमेंट्स केल्याचे पाहायला मिळाले आहे. तर अनेक हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे.
याबरोबरच, अमृताने केदारनाथ यात्रेचे विविध फोटो पोस्ट करीत तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. अमृताच्या कामाबद्दल बोलायचे तर काही दिवसांपूर्वीच ती सुशीला-सुजीत चित्रपटातील ‘चिऊताई चिऊताई दार उघड’या गाण्यातून भेटीला आली होती. या गाण्यात तिच्याबरोबर अभिनेता गश्मीर महाजनीदेखील होता. त्यांच्या डान्सचे मोठे कौतुक झाले होते. ‘लाइक आणि सबस्क्राईब’, ‘हर हर महादेव’, ‘चंद्रमुखी’ अशा अनेक चित्रपटांतून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
दरम्यान, अमृता आगामी काळात कोणत्या माध्यमातून आणि भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.