Ravindra Mahajani Death: ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. ते शुक्रवारी तळेगाव दाभाडेजवळ आंबी या गावातील घरी मृतावस्थेत सापडले. फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर त्यांच्या मृत्यूची माहिती समोर आली. ते गेल्या काही महिन्यांपासून इथं भाड्याने राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनावर ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

Ravindra Mahajani Death: “आठ महिन्यांपासून एकटेच राहत होते रवींद्र महाजनी”, पोलिसांची माहिती; म्हणाले, “मुलगा गश्मीरलाही…”

मराठी चित्रपटसृष्टीने एक देखणा नट गमावला, असं अशोक सराफ यांनी म्हटलंय. “खूप वाईट घडलंय. आमच्या पिढीतला एकमेव देखणा नट गेला, असं मला वाटतं. तो हिरो आणि मी साईडला असे बरेच चित्रपट आम्ही एकत्र केलेत. आम्ही यशस्वी चित्रपट केले आहेत. एक चांगला माणूस, एक चांगला मित्र गेल्याने खूप दुःख होतंय. एक चांगला नट, मित्र गमावल्याचं दुःख मनात कायम राहील. नेहमी हसत खेळत वावरणारा, हसमुख चेहऱ्याचा नट होता. प्रामाणिकपणा हा त्याच्यातला सर्वात मोठा गुण होता, तो प्रत्येक भूमिका उत्तम करायचा. जे करायचा ते मन लावून करायचा, त्यामुळे तो त्या काळातला एक यशस्वी नट होता,” अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी ‘टीव्ही ९’ शी बोलताना दिली.

पुणे: प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले

दरम्यान, रवींद्र महाजनी हे मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र यांनी ‘मुंबईचा फौजदार’, ‘झूंज’ आणि ‘कळत नकळत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा देखील अभिनेता आहे.