Ashvini Bhave Daughter Sachi Bopardikar : आपल्या मुलांनी आयुष्यात यशस्वी व्हावं अशी प्रत्येक आईची इच्छा असते. अगदी सिनेविश्वातील अभिनेत्री सुद्धा आपलं करिअर सांभाळून मुलांचा अभ्यास, त्यांची आवड, मुलांचं करिअर याकडे आवर्जून लक्ष देत असतात. काही लोकप्रिय अभिनेत्रींनी मुलांसाठी करिअरमधून काही वर्षे ब्रेक घेतल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. अभिनेत्री सुकन्या मोने, माधुरी दीक्षित यांची मुलं काही महिन्यांपूर्वीच पदवीधर झाली. यावेळी या अभिनेत्रींनी मुलांसाठी खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता.
आता नुकतीच आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीची लेक पदवीधर झाली आहे. मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच अश्विनी भावे. त्यांचा दमदार अभिनय व सौंदर्याने प्रेक्षकांना कायमच भुरळ घातली. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी देखील गाजवली. सध्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात.
अश्विनी भावे लग्नानंतर अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या. त्यांच्या पतीचं नाव किशोर बोपर्डीकर असं आहे. अश्विनी यांच्या मुलांचं बालपण आणि शिक्षणही अमेरिकेत पूर्ण झालं. नुकतीच त्यांची लेक साची बोपर्डीकर पदवीधर झाली आहे. अश्विनी यांनी खास पोस्ट शेअर करत लाडक्या लेकीचं कौतुक केलं आहे.
लॉस एंजेलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून अश्विनी भावेंची लेक साची पदवीधर झाली असून तिने बायोमेडिकल रिसर्चमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. साचीचं सध्या सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
अश्विनी भावे लेकीबद्दल लिहितात, “अभिनंदन, माय डिअर… ABC पासून सुरू झालेला प्रवास आज तुझ्या स्वप्नपूर्तीपर्यंत येऊन पोहोचला आहे. आम्हा दोघांना तुझा खूप-खूप अभिमान वाटतोय…शब्दात सांगता येणार नाही एवढी मी आनंदी आहे.”
निवेदिता सराफ यांनी, “साची आणि तिच्या आई-बाबांचं खूप खूप अभिनंदन” अशी कमेंट अश्विनी भावेंच्या पोस्टवर केली आहे. याशिवाय मेघा धाडे, शुभांगी गोखले, मिलिंद जोशी या कलाकारांनीही साचीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, अश्विनी भावेंच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर जुलै २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घरत गणपती’ चित्रपटात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या निमित्ताने जवळपास २५ वर्षांनी प्रेक्षकांना ऑनस्क्रीनवर अजिंक्य देव व अश्विनी भावेंची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली.