प्रत्येक आई-वडिलांच्या त्यांच्या मुलांकडून काही न काही अपेक्षा असतात. पालकांना कायम असं वाटत असतं की, त्यांच्या मुलांनी त्यांच्या जीवनात खूप मोठं व्हावं, नाव कमवावं; तर मुलांनाही त्यांच्या आई-वडिलांची ही सर्व स्वप्न पूर्ण करायची असतात. पण, यश हे प्रत्येकालाच मिळतं असं नाही आणि मिळालं तरी जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर मिळेल याची काही शाश्वती नसते. त्यामुळे अनेकदा असं चित्र पाहायला मिळतं, जिथे मुलांनी हवं ते सगळं कमवलेलं असतं, परंतु तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे आई-वडील नसतात.
त्यामुळे ज्या आई-वडिलांमुळे यश मिळालं त्यांची आठवण म्हणून काहीतरी असावं यासाठी आठवण स्वरुपात ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. असं काहीसं आई-वडिलांच्या आठवणीत मराठमोळे अभिनेते भरत जाधव यांनीदेखील केलं आहे. त्यांच्या या कृतीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. भरत जाधव यांच्या वडिलांनी त्यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली होती. याबाबत भरत जाधव यांनी ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. ते म्हणाले, “माझ्या बाबांनी माझ्याकडे कोल्हापुरात आपलं स्वत:चं घर असावं अशी इच्छा व्यक्त केली होती.”
भरत जाधव यांनी त्यांच्या वडिलांची ही इच्छा पूर्ण केली. २००७ साली त्यांनी कोल्हापुरात स्वत:चं घर खरेदी केलं. यासह भरत यांचं कोल्हापुरात त्यांच्या रानात एक फार्महाऊसही आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या आठवणीत त्यांचं स्मारक बांधलं आहे. भरत जाधव यांच्या फार्महाऊसमध्ये म्हणजेच रानातील घरात राधा-कृष्णाचं मंदिर आहे आणि पुढे त्याच छताखाली त्यांच्या आई-वडिलांचं स्मारक आहे.
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले, “माझ्यासाठी आई-वडील देवासमान आहेत आणि नेमकं इथे राधा-कृष्णाचं मंदिर असलेल्या छताखालीच आई-वडिलांचं स्मारक आहे.” भरत जाधव यांच्या वडिलांना जाऊन बराच काळ लोटला, तर काही दिवसांपूर्वी त्यांच्या आईचं निधन झाल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं.
भरत जाधव हे मुळचे कोल्हापूरचे. पण, १९४८ मध्ये त्यांचे आई-बाबा मुंबईत येऊन स्थायिक झाले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी टॅक्सी चालवली व त्यांच्या मुलांचा सांभाळ केला, त्यांना शिकवलं; तर भरत जाधव हे त्यांच्या भावंडांमध्ये सगळ्यात लहान आहेत.
दरम्यान, भरत जाधव हे मराठी इंडस्ट्रीतील अष्टपैलू अभिनेते आहेत. आजवर त्यांनी विनोदी, गंभीर, नायकाची तसेच खलनायकाची अशा विविध भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच ते ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यानंतर ते ‘बंजारा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेते शरद पोंक्षे यांच्या मुलाने केलं असून यामध्ये सुनील बर्वे, भरत जाधव, शरद पोंक्षे, संजय मोने यांसारखे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. येत्या १६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.