Bharat Jadhav shares memory of Laxmikant Berde : मराठी सिनेसृष्टीचा एक काळ गाजवलेले दिवंगत अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांच बेर्डे. प्रेक्षकांचे तसंच इंडस्ट्रीतील अनेकांसाठी ते लाडके ‘लक्ष्या’ होते. आजही ते सर्वांचे तितकेच लाडके आहेत. १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांचे निधन झाले. प्रेक्षकांना पोट धरून हसवणाऱ्या आणि तितकंच आपल्या अभिनयाने अंतर्मुख करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डेंचा ‘पछाडलेला’ हा चित्रपट शेवटचा ठरला. लक्ष्मीकांत यांना जाऊन इतकी वर्षे लोटली असली तरी कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्यांची आठवण येतेच.

अशातच अभिनेते भरत जाधव यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण व्यक्त केली आहे. यानिमित्ताने भरत जाधव यांनी त्यांच्याबद्दलचा एक किस्सादेखील शेअर केला आहे. भरत जाधव यांनी नुकताच आरपार या युट्यूब वाहिनीबरोबर संवाद साधला. या संवादात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण काढली. यावेळी भरत जाधव लक्ष्मीकांत यांच्याबद्दल म्हणाले की, “मला त्या माणसाने खूप मदत केली आहे. साध्या घरातलेच माणूस होते. पण प्रत्येक प्रतिभावान मुलाला त्यांनी संधी दिली.”

पुढे भरत जाधव त्यांच्याबद्दल म्हणाले की, “एकदा आम्ही शूटिंग करत होतो. त्यावेळेस माझं एक नाटक बरं चाललं होतं. तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेंचं शूटिंग संपलं होतं आणि ते मुंबईसाठी यायला निघणार होते. तेव्हा अभिनय, स्वानंदी आणि प्रियाताईसुद्धा त्यांच्याबरोबर मुंबईला येणार होते. तेव्हा माझी पत्नी आणि मुलगीही माझ्याबरोबर शूटिंगच्या इथे आले होते आणि मी त्यांना दुसऱ्या दिवशी एका वेगळ्या गाडीने मुंबईला पाठवणार होतो. तेव्हा लक्ष्या मामा म्हणाले की, नाही नाही. मी माझ्याबरोबर त्यांना घेऊन जातो.”

यानंतर भरत जाधव म्हणाले, “तेव्हा लक्ष्या मामा म्हणाले की, मी चाललोच आहे; तर मी त्यांना सोडतो. त्या माणसाने माझ्या मुलीची व्यवस्थित काळजी घेतली. जिथे मी पवईला राहत होतो. तिथे त्यांनी दोघींना सोडलं. तेव्हा त्यांनी माझ्या पत्नीकडे माझ्या घराबद्दल विचारणा केली. तेव्हा सरिताने त्यांना सांगितलं की, हे आमचं घर आहे. बाजूचं दुसऱ्याचं घर आहे. तेव्हा लक्ष्या मामाने तिला सांगितलं की, आता बाजूचं घरसुद्धा भरत घेणार. बघ तू. तो खूप मेहनत करत आहे. आता हा माझ्यासाठी किती मोठा आशीर्वाद आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भरत जाधव व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘पछाडलेला’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डेंच्या अभिनयाबरोबरच भरत जाधव यांच्या भूमिकेचंही कौतुक झालं होतं. भरत जाधव साध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आता थांबायचं’ नाय या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाबरोबरच त्यांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे.