Happy Birthday Sanjay Jadhav : ‘चेकमेट’, ‘दुनियादारी’ ते ‘येरे येरे पैसा’; मराठी सिनेविश्वाला एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देणारे लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशननिमित्त संपूर्ण मराठी सिनेसृष्टी एकत्र जमल्याचं पाहायला मिळालं.
आज संजय जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. मात्र, या सगळ्यात ‘चला हवा येऊ द्या’ फेम लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
संजय जाधव यांना शुभेच्छा देताना कुशल लिहितो, “जगात जेवढे डाएट प्लॅन्स उपलब्ध आहेत, ते सगळे करूनही एका इंचानेही कमी न झालेल्या संजू दादा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू सिनेमा जगणारा माणूस आहेस आणि आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच तुझा ‘येरे येरे पैसा ३’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. यासारखा ‘दुग्ध-शर्करा’ योग नाही! आज त्याच दुधाने तुझं तोंड गोड करायला हवं, पण कुठल्या तरी डाएट प्लॅनमुळे तू साखर बंद केल्याचं नुकतंच कळलंय. त्यामुळे ते राहू दे. दादा, आज तुझ्या वाढदिवसाला देवाकडे प्रार्थना करतो की डाएट न करता तुझं वजन कमी होऊ दे आणि या ‘येरे येरे पैसा ३’मुळे मनोरंजन क्षेत्रातलं तुझं वजन अजून-अजून वाढत राहू दे. Happy Birthday दादा! आणि I love you.”
कुशलच्या या भन्नाट पोस्टवर दिग्दर्शक संजय जाधव यांनी ‘लव्ह यू’ अशी कमेंट केली आहे. दरम्यान, या लोकप्रिय दिग्दर्शकाच्या वाढदिवसाला सई ताम्हणकर, मनवा नाईक, सोनाली खरे, सिद्धार्थ जाधव, सुशांत शेलार, श्रेया बुगडे, आशुतोष गोखले, अंकुश चौधरी, सचित पाटील यांच्यासह आणखी बरेच कलाकार उपस्थित होते.
संजय जाधव यांचा वाढदिवस आणि ‘येरे येरे पैसा ३’ हा सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने यंदा मराठी कलाकारांकडून जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. याशिवाय हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहा असं आवाहनही कलाकारांनी प्रेक्षकांना केलं आहे.