Chhaya Kadam at Cannes 2025: कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू होऊन चार दिवस झाले आहेत. यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर अनेक बॉलीवूड स्टार्सनी पदार्पण केलं. जॅकलिन फर्नांडिस उद्घाटन समारंभात नव्हती, पण तिसऱ्या दिवशी तिने तिच्या सौंदर्याने कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बॉलीवूड स्टार्सबरोबरच यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या अभिनेत्री छाया कदम यांनी हजेरी लावली.
छाया कदम यांचं ‘कान्स’मधील दुसरं वर्ष आहे. त्यांनी या सोहळ्यातील काही खास फोटो पोस्ट केले आहेत. छाया कदम गुलाबी साडीत खूपच सुंदर दिसत आहे. छाया यांनी सलग दुसऱ्या वर्षी ‘कान्स’मध्ये हजेरी लावण्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी खास पोस्टमध्ये काय म्हटलंय, ते जाणून घेऊयात.
छाया कदम यांची पोस्ट
२०२५ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलचा हा पहिला दिवस. मागच्या वर्षी बरोबर याच दिवशी माझा कान्स मधला पहिला दिवस होता. त्यावेळी अगदी नवखी असल्या सारखी वावरत होते. काही गोष्टींचं उगाचच दडपण घेतलं होतं. पण ते ही मी एन्जॉय केलं होतं. यावर्षी ही जागा – हे शहर आणि इथे भेटणारी माणसं सगळं आपलं आपलं वाटतंय. इथल्या रस्त्यांसोबत – इथल्या रंगीबेरंगी कपडे घातलेल्या माणसांसोबत जुनी ओळख असल्या सारखं वाटतंय.
गेल्या वर्षीच्या कान्स फेस्टिव्हलमुळे तयार झालेले कुटुंब यावर्षी अजून विस्तारात गेल्याचे जाणवले. आता उत्सुकता आहे ती आजच्या माझ्या आणि अर्थात आपल्या स्नो फ्लॉवरच्या स्क्रिनिंगची, अशी पोस्ट छाया कदम यांनी केली आहे.
‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’ मध्ये पायल कपाडिया दिग्दर्शित ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ (All We Imagine as Light) या चित्रपटाचं स्क्रिनिंग झालं होतं. याच चित्रपटात छाया कदम यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने छाया कदम २०२४ च्या ‘कान्स फेस्टिव्हल’मध्ये गेल्या होत्या. त्यांनी या फेस्टिव्हलमध्ये आईची साडी, नथ, केसात गजरा आणि कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक करून केला होता. यंदाही त्यांनी कान्ससाठी साडी निवडली. त्या या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे. त्यांच्या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.