Dashavatar Box Office Collection Day 6: ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर क्रेझ पाहायला मिळतेय. चित्रपटाने सहा दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. बऱ्याच दिवसांनी एका मराठी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा पाहायला मिळत आहे. दशावतार सिनेमागृहांमध्ये बॉलीवूड चित्रपटांना टक्कर देतोय.

कोकणातील पार्श्वभूमीवर बेतलेला ‘दशावतार’ चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित ‘दशावतार’मध्ये ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री नावाचे पात्र साकारले आहे. त्यांच्याबरोबरच इतर मराठी कलाकारांनीही चित्रपटात उत्तम काम केलं आहे.

‘दशावतार’ चे सहा दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘दशावतार’ ने पहिल्या वीकेंडला म्हणजेच शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत जगभरात तब्बल ५.२२ कोटी रुपये कमावले. चौथ्या दिवशी दशावतारने एक कोटी कमावले. त्यानंतर पाचव्या दिवशी कमाईत वाढ झाली. मंगळवारी सिनेमाने १.३ कोटी कमावले. आता इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या आकडेवारीनुसार, दशावतारने बुधवारी म्हणजेच सहाव्या दिवशी १.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. ही प्रारंभिक आकडेवारी आहे. अधिकृत आकडेवारी आल्यानंतर यात बदल होऊ शकतो.

दशावतारचे एकूण कलेक्शन

‘दशावतार’ ला मिळणारा उदंड प्रतिसाद पाहून निर्माते भारावले आहेत. या चित्रपटाने ६ दिवसांत जगभरात एकूण ८ कोटी ८८ लाख रुपयांचा गल्ला जमवला आहे. दशावतार चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटर्समध्ये गर्दी करत आहेत. फक्त मराठीच नव्हे तर इतर भाषिक प्रेक्षकही दशावतार सिनेमा बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात जात आहेत.

कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे दशावतार. कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता दशावतारमध्ये दाखवण्यात आली आहे. दशावतारचे शूटिंग कोकणात करण्यात आले आहे.

दशावतार चित्रपटातील कलाकार

‘दशावतार’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज आहे. तसेच विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.