Dashavatar Worldwide Box Office Collection: बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘दशावतार’ बॉक्स ऑफिस गाजवत आहे. ‘दशावतार’ ने जगभरात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. निर्मात्यांनी ‘दशावतार’च्या कलेक्शनबद्दल पोस्ट केली आहे. जगभरातून ‘दशावतार’ला मिळणारा प्रतिसाद पाहता निर्माते भारावले आहेत.

झी स्टुडिओजने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. “मराठी चित्रपटाला सुवर्णकाळ दाखवणारे तुम्हीच रसिक मायबाप आहात,
तुमच्यामुळेच हे शक्य आहे!
महाराष्ट्रातल्या मातीतल्या या कलाकृतीला जगभरातून प्रतिसाद मिळतोय, आम्हाला त्याचा अभिमान आहे,” असं कॅप्शन त्यांनी पोस्टला दिलं आहे.

‘दशावतार’ ने तीन दिवसांत जगभरात तब्बल ५.२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘दशावतार’ला फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर जगभरात उत्तम प्रतिसाद मिळतोय, हे या चित्रपटाच्या तीन दिवसांच्या कलेक्शनमधून दिसून येतंय.

पाहा पोस्ट-

‘दशावतार’ चित्रपट शुक्रवारी, १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर आधारित या चित्रपटाची घोषणेपासूनच खूप चर्चा होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक हा चित्रपट पाहायला गर्दी करत आहेत. कोकणातील नयनरम्य ठिकाणी सलग ५० दिवस या सिनेमाचं शूटिंग झालंय. कोकणातीर दशावतार ही परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ या सिनेमात दाखवण्यात आला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री ही भूमिका केली आहे.

‘दशावतार’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर अशी मराठी चित्रपटातील दिग्गज कलाकारांची फौज आहे. तसेच विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

‘दशावतार’ चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबरच सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी यांनी केली आहे. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहेत.