Gashmeer Mahajani on Marathi films: अभिनेता गश्मीर महाजनी हा त्याच्या अभिनयामुळे ओळखला जातो. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांत तो पडद्यावर दिसला नसला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच प्रेक्षकांच्या संपर्कात असतो.
गश्मीर सोशल मीडियावर अनेकदा चाहत्यांशी थेट संवाद साधतो. आस्क गश या सेशनमध्ये तो चाहत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देतो. चाहते अनेकदा त्याला तो पुन्हा अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार आहे, असे प्रश्न विचारतात.
कधी त्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही प्रश्न विचारतात. काही जण त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगतात; तर काही जण त्याला त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग विचारतात. गश्मीरदेखील या सर्व प्रश्नांची कधी गमतीने, कधी गंभीरतेने, संयमाने उत्तरे देत असल्याचे दिसते.
“तिकिटांचे दर वाढविण्यापेक्षा…”
आता नुकताच ‘आस्क गश’ या सेशनमध्ये एका चाहत्याने त्याला विचारले की, गश्मीर जर मराठी चित्रपटांचे बजेट कमी आहे, तर मग तिकिटांचे दर कमी का नाहीत? त्यावर गश्मीर म्हणाला, “तिकिटांचे दर वाढविण्यापेक्षा आपण चित्रपट निर्मितीचा दर्जा वाढवण्याबद्दल विचार केला पाहिजे. आधी चांगले चित्रपट बनवले पाहिजेत आणि त्यानंतर पैशाबद्दल विचार केला पाहिजे; हे साधं गणित आहे.”
त्याबरोबरच एकाने विचारले की, तुझा आगामी प्रोजेक्ट कधी येणार? त्यावर अभिनेता गश्मीर म्हणाला, “फेब्रुवारीमध्ये शूटिंग करणार आहे. २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे”, आणखी एकाने विचारले की कोणत्या दिग्दर्शकाबरोबर काम करायचे आहे? त्यावर गश्मीरने श्रीराम राघवन यांचे नाव घेतले. एकाने विचारले की, तुझ्या कोणत्या चित्रपटाचा तुला सीक्वेल काढायला आवडेल? त्यावर अभिनेत्याने कोणत्याच नाही, असे उत्तर दिले. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे गश्मीरने दिली आहेत.

गश्मीरने याआधीही अनेकदा तो २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे. गश्मीर अभिनयाबरोबरच त्याच्या नृत्यासाठीदेखील ओळखला जातो.
आता गश्मीर महाजनीचा हा प्रोजेक्ट नेमका काय असणार आहे, या चित्रपटात त्याच्याबरोबर कोण प्रमुख भूमिकेत असणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
दरम्यान, गश्मीर महाजनी हा देऊळ बंद, फुलवंती, इमली, खतरों के खिलाडी, सरसेनापती हंबीरराव अशा चित्रपट, मालिका आणि रिअॅलिटी शोसाठी ओळखला जातो.
