सध्या राज्यात हर हर महादेव या चित्रपटावरुन जोरदार वाद रंगला आहे. या चित्रपटातील काही दृश्यांची मोडतोड केल्याचा आरोप केला जात आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुन वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात चुकीच्या पद्धतीने ऐतिहासिक प्रसंग दाखविण्यात आल्याचे बोललं जात आहे. नुकतंच या संपूर्ण प्रकरणावर दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी भाष्य केले.

ठाण्यातील विवियाना मॉलमधील चित्रपटगृहात सुरू असलेला ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली होती. यानंतर बराच गोंधळ पाहायला मिळाला. यावरही ‘हर हर महादेव’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित देशपांडेनी स्पष्ट भूमिका घेतली. ई-सकाळला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीत अभिजीत देशपांडे बोलत होते. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

अभिजीत देशपांडे काय म्हणाले?

“जेव्हा आपण कारवाईबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही कायदा मोडलाय आणि तुम्हाला त्याची शिक्षा मिळायला हवी. मला राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर फार विश्वास आहे. हे सक्षम सरकार आहे. हे नक्कीच एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला माफ करणार नाही. त्या उचित कारवाईचे स्वागतच आहे. शिक्षाही झालीच पाहिजे.

मला न्याय मिळणं किंवा त्या मारहाण झालेल्या प्रेक्षकाला न्याय मिळणं हा मुद्दा नाही. ते व्हायलाच पाहिजे. एखाद्या चित्रपटाचा ठराविक एक काळ असतो. त्या काळात काही वाद निर्माण केला, चित्रपटाचे नुकसान चित्रपटगृहांच्या मालकांना धमकावलं, प्रेक्षकांना धमकावलं की तो चालणार नाही हे यांना माहिती होतं. त्यामुळे यांचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होता.

यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळे विचार मांडले होते. त्यात छत्रपतींचा आपण सर्व एक व्हावं, हा विचार मांडला गेला होता. जाती, धर्म हा भेद विसरुन माणूस म्हणून एक व्हावं आणि छत्रपतींची ही बाजू काही लोकांना महाराष्ट्रासमोर आणायची नाही. कारण उद्या समजा जर आपण एकमेकांना आडनाव सोडून एकमेकांचा आदर करायला लागलो, सन्मान करायला लागलो, माणूस म्हणून बघायला लागलो तर मग यांच्या राजनैतिक पोळ्या कशा भाजल्या जातील?” असा प्रश्न अभिजीत देशपांडेंनी उपस्थित केला.

आणखी वाचा : “तज्ज्ञ इतिहासकारांचा सल्ला घेऊन आणि…” ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावर झी स्टुडिओचा खुलासा

“जर एखादा चित्रपट त्यांच्या जाती पातीच्या राजकारणावर, द्वेषाच्या विरुद्ध असेल तर त्याचे चित्रपट बंद पाडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. तोच प्रयत्न झाला आहे. पण मला प्रेक्षकांवर पूर्ण भरोसा आहे. अनेक ठिकाणी शो हाऊसफुल आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुम्ही जय शिवराय म्हणता आणि एखाद्या प्रेक्षकाची २०-३० लोक मिळून मारहाण करता हे कोणते छत्रपती शिवरायांचे विचार तुम्हाला शिकवले आहेत. त्या माणसाला त्यादिवशी फक्त मारलं नाहीत तर छत्रपती शिवरायांच्या विचारांना तुम्ही पायदळी तुडवलंत. त्यांच्या विचारांचा गळा कापलात. त्यांनी आपल्याला एकीचा वारसा दिला आहे. त्याठिकाणी मराठी माणूसच मराठी माणसाला मारत होते, हे तुम्ही शिवरायांच्या नावावर करणार, खरतंर हा अक्षम्य गुन्हा आहे. त्याची त्यांना जी शिक्षा व्हायची ती होणारच….!”, अशा शब्दात अभिजीत देशपांडेंनी त्यांची भूमिका मांडली.