मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या आघाडी अभिनेत्यांपैकी एक म्हणजे हेमंत ढोमे. हेमंतने आपल्या अभिनयासह दिग्दर्शनाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. हेमंत निर्मितीची धुरा देखील उत्तमरित्या सांभाळतो. आज महाराष्ट्र दिनी हेमंत ढोमेने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ असं त्यांच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे. हेमंतने सोशल मीडियावर या नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे.

‘पोस्टर गर्ल’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ यांसारखे दर्जेदार चित्रपट देणाऱ्या हेमंत ढोमेने महाराष्ट्र दिनानिमित्ताने त्यांच्या ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. पत्नी क्षिती जोगच्या चलचित्र मंडळी या निर्मिती संस्थेचा हा पाचवा सिनेमा असणार आहे. तर आनंद एल राय यांच्या कलर यल्लो प्रॉडक्शनबरोबर त्यांचा सलग तिसरा चित्रपट असणार आहे.

मराठी शाळांमधील शिक्षण पद्धती, मातृभाषेत शिकण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट मनोरंजन करताना विचार करायला लावणारा ठरेल. शिक्षण क्षेत्रातील बदल, मराठी शाळांची कमी होणारी संख्या आणि मातृभाषेच्या माध्यमातून होणाऱ्या जडणघडणीवर हा चित्रपट प्रकाश टाकणार आहे. हेमंत ढोमेने याआधी ‘झिम्मा’, झिम्मा २’, ‘फसक्लास दाभाडे’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे संवेदनशील विषय मनोरंजनाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडले होते. आता ‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ हा एक वेगळा सामाजिक विषय प्रेक्षकांसाठी ते घेऊन येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘क्रांतीज्योति विद्यालय – मराठी माध्यम’ या नव्या चित्रपटाविषयी सांगताना हेमंत ढोमे म्हणाला, “मराठी माध्यमातून मिळालेलं शिक्षण हे माझं बळ ठरलं, अडथळा नाही. मातृभाषेत शिकल्यामुळे मला माझी संस्कृती, परंपरा आणि माणसं समजली आणि याच जडणघडणीचा अभिमान मी जगभर मिरवू शकलो. आपल्या मातीत रुजावं आणि आभाळाला भिडावं! आज मी जो काही आहे, तो माझ्या मराठी शाळांमुळेच आहे. माझे शालेय शिक्षण हे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी एकूण आठ मराठी शाळांमधून झालं. ज्यात जिल्हा परिषद शाळा देखील होत्या ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे. परंतू आजकाल मराठी शाळा बंद पडत आहेत, त्यांची पट संख्या खालावत आहे ही चिंतेची बाब असून या चित्रपटातून मातृभाषेतील शिक्षण हे कमीपणाचं नसून, खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं असतं हे अधोरेखित करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.”