चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. आता या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधून सात जणींच्या सात तऱ्हा पुन्हा एकदा मजेशीर पद्धतीने झळकताना दिसत आहेत. त्यामुळे ‘झिम्मा’ चित्रपटाची गँग पुन्हा एकदा रियुनियनसाठी सज्ज झाली आहे.

या टीझरची सुरुवात सिद्धार्थ जाधवच्या नवीन सहल ठरवण्यापासून होते. तो व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकतो आणि त्यानंतर मग ही सर्व धम्माल सुरु होते. या टीझरमध्ये सिद्धार्थचा एक डायलॉग आहे, ”यावेळेला खूपच व्हरायटी आहे.” आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या ताफ्यात आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत.
आणखी वाचा : “पुढच्या ट्रिपची तारीख ठरली…”, बहुप्रतिक्षित ‘झिम्मा २’ चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

‘झिम्मा’ या चित्रपटात नवीन मैत्री झाली होती. हळूहळू ती बहरत गेली होती. आता ‘झिम्मा २’ मध्ये ही मैत्री अधिकच परिपक्व झाल्याचे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरु शकते.

या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव आणि सिद्धार्थ चांदेकर झळकणार आहेत. त्यांच्याबरोबरच आता रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघीही यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यात शिवानी ही सुचित्रा बांदेकरची भाची दाखवण्यात आली आहे. तर रिंकू राजगुरु ही निर्मिती सावंतच्या सुनेचे पात्र यात साकारत आहे. त्यांची झलकही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा : “इंदू डार्लिंगचा ७५ वा वाढदिवस आणि एक सरप्राईज…”, ‘झिम्मा २’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ‘झिम्मा २’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत निर्मिती संस्था ‘कलर यल्लो प्रोडक्शन’ आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहेत. चलचित्र मंडळी आणि क्रेझी फ्यु फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे निर्माते आनंद एल. राय आणि क्षिती जोग आहेत आणि विराज गवस, उर्फी काझमी, अजिंक्य ढमाळ हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.