Hruta Durgule Express gratitude after receiving the Best Debut Award: नुकताच महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्याबरोबरच अभिनेत्री काजोलदेखील तिच्या आईसह या सोहळ्याला पोहोचली होती.

लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, तसेच निर्माते महेश मांजरेकर यांना कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. मृण्मयी देशपांडेला सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर उत्कृष्ट संवादासाठी प्रवीण तरडेंना कैलासवासी आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आर्या आंबेकरला उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. दीपक पाटीलला ‘आशा’ सिनेमासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेत्री रिंकू राजगुरूला उत्कृष्ट अभिनेत्रीचा कै. स्मिता पाटील हा पुरस्कार मिळाला; तर मुक्ता बर्वेला कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्यानंतर हृता दुर्गुळेची खास पोस्ट

लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळेला ‘अनन्या’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला आहे. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करrत आनंद, तसेच कृतज्ञता व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर केले.

हृताने लिहिले, “मी कृतज्ञतेने भारावून गेले आहे. ६० व्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारांमध्ये माझ्या ‘अनन्या’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला अभिमान आहे. मी अधिक परिश्रम करण्यास आणि अर्थपूर्ण प्रोजेक्ट निवडण्याचा प्रयत्न करेन.”

पुढे अभिनेत्रीने अनन्या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फड यांना टॅग करत त्यांचे अभिनंदन केले. हृताने लिहिले, “सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा दिग्दर्शक पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्यासाठी मी खूप आनंदी आहे. तुम्ही मला अनन्या या चित्रपटासाठी कास्ट केले, त्यासाठी मी कायमच तुमची ऋणी असेन. तुमच्याशिवाय हे शक्य झाले नसते. माझा प्रत्येक पुरस्कार तुम्हाला समर्पित असेल.”

या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या या प्रवास साथ देणाऱ्या अनेकांचे आभार मानले आहेत. तसेच, चित्रपटाचे निर्माते रवी जाधव यांच्याप्रतिदेखील कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अभिनेत्रीने पती प्रतीक शाहचेदेखील आभार मानले आहेत. तिने प्रतीकला टॅग करत लिहिले, “तुझ्या माझ्या आयुष्यात असण्याने तू माझं जग आणखी उत्तम केले आहेस.” शेवटी तिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या तिच्या कुटुंबाचेदेखील आभार मानले आहेत.

कलाकारांनी केला कौतुकाचा वर्षाव

हृताच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता ललित प्रभाकरने अभिनंदन! ही तर फक्त सुरुवात आहे, असे लिहिले. तर रवी जाधव यांनी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण, असे लिहिले आहे. त्याबरोबरच आशुतोष गोखले, वैदही परशुरामी, तसेच सायली संजीव यांनी अभिनंदन, असे लिहिले आहे.

हृताला पुरस्कार मिळाल्यानंतर तिच्या पतीने म्हणजे प्रतीक शाहने पोस्ट करीत तिचे कौतुक केले आहे. मला तुझा अभिमान आहे, असे लिहीत त्याने त्याचा आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेत्री लवकरच ललित प्रभाकरबोरबर आरपार या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.