Marathi Actor Jaywant Wadkar Daughter Engagement : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईक-अमित रेखी, लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी व समाधान सरवणकर यांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. आता या पाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या लेकीच्या साखरपुड्यातील व्हिडीओ अन् फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

मराठी नाटक, मालिका, सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या हरहुन्नरी अभिनयाचा ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणून जयवंत वाडकरांना ओळखलं जातं. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्यांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. सध्या जयवंत वाडकर त्यांच्या लेकीमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या लेकीचा म्हणजेच स्वामिनीचा साखरपुडा नुकताच थाटामाटात पार पडला आहे. स्वामिनीचा होणारा पती वरुण नायर हा मल्याळम आहे. त्याचं स्वत:चं प्रोडक्शन हाऊस असल्याचं वरुणने त्याच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये नमूद केलं आहे.

जयवंत वाडकर लेकीच्या साखरपुड्याबद्दल सांगतात, “एके दिवशी मी शूटिंगवरून आलो आणि स्वामिनी मला म्हणाली…मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला नेमकं समजेना हिला काय बोलायचं असेल. त्यानंतर तिने मला सांगितलं की, असं-असं आहे. पण, खरं सांगायचं झालं तर मला कुठे ना कुठे या सगळ्याची जाणीव थोडिशी होती. तेव्हाच मी स्वामिनीला सांगितलं होतं आणि आजही सांगतोय मी काहीही झालं तरी तुझ्या पाठिशी राहणार…”

जयवंत वाडकर यांच्या पत्नी यावेळी म्हणाल्या, “दोघेही स्वामीभक्त एकमेकांना भेटले त्यामुळे मला खूप आनंद आहे. यापेक्षा वेगळा आनंद असू शकत नाही. स्वामिनीच्या आयुष्यात आलेला मुलगा वरुण हा सुद्धा स्वामीभक्त आहे. हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्या दोघांच्या डोक्यावर कायम स्वामींचा आशीर्वाद असेल. मला माहिती नव्हतं की, वरुण मल्याळम असून केरळचा असूनही स्वामींचा भक्त आहे. मी दोघांसाठीही खरंच खूप आनंदी आहे.” हा व्हिडीओ राजश्री मराठीने शेअर केला आहे.

साखरपुड्याला स्वानंदी आणि वरुण यांनी खास ट्विनिंग लूक केला होता. स्वामिनीने नेव्ही ब्लू रंगाचा घागरा तर, वरुणने सुद्धा त्याच रंगाची शेरवानी घातली होती. यावेळी गुडघ्यावर बसून त्याने स्वानंदीला अंगठी घातली. या दोघांच्या साखरपुड्याला स्वानंदी बेर्डे, गौरव मोरे, अभिनय बेर्डे अशी कलाविश्वातील मंडळी सुद्धा उपस्थित होती.

दरम्यान, स्वामिनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर स्वामिनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे ग्लॅमरस फोटो देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत असतात. ‘अशी ही आशिकी’, ‘बाबा’ यांसारख्या प्रोजेक्टमध्ये तिने काम केलेलं आहे. याशिवाय ‘HC London’ या कंपनीची ती ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहे.