Kantara Director Rishabh Shetty Reaction On Dashavatar : सुबोध खानोलकर लिखित आणि दिग्दर्शित ‘दशावतार’ या सिनेमाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. उत्तम कथानक, उत्तम अभिनय, उत्तम संगीत असलेला हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस पडत आहे. कोकणातल्या बाबुली मेस्त्रीची ही गोष्ट मराठी रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली आहे. सर्वच स्तरातून ‘दशावतार’चं कौतुक होत आहे.

अशातच आता ‘दशावतार’बद्दल ‘कांतारा’चे दिग्दर्शक ऋषभ शेट्टींनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दशावतार’ या सिनेमाच्या सुरुवातीपासूनच ‘कांतारा’शी तुलना होत होती. लोककला आणि परंपरा या दोन्ही गोष्टींमुळे ‘दशावतार’ ‘कांतारा’सारखा असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. त्याबद्दल आता ऋषभ शेट्टीने आपलं मत व्यक्त केलं.

ETimes ला दिलेल्या मुलाखतीत ऋषभ शेट्टी याने ‘दशावतार’बद्दल म्हटलं की, “गेले काही दिवस मी ‘दशावतार’ या मराठी सिनेमाबद्दल चांगलं ऐकत आहे. पण ‘कांतारा’चं प्रमोशन उशिरा सुरू झाल्यामुळे मला अजून ‘दशावतार’ सिनेमा बघायला वेळ मिळालेला नाही. पण मी लवकरच हा सिनेमा बघणार आहे.”

यापुढे तो म्हणाला, “ज्या कथा माणसाच्या मूळ, संस्कृती आणि निसर्गाशी संबंधित असतात, त्या कथा प्रेक्षकांना कधीही कंटाळवाण्या वाटत नाहीत. अशा कथा प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच विचार करायलाही प्रवृत्त करतात. तसंच अशा कथा या पुढच्या पिढ्यांसाठी एक महत्त्वाचा दस्ताऐवज असतात.”

दरम्यान, या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, आरती वडगबाळकर असे कलाकार आहेत. १२ सप्टेंबर रोजी आलेला हा सिनेमा अजूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे.

‘कांतारा: चॅप्टर १’ आणि ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ या दोन सिनेमांमुळे ‘दशावतार’च्या कमाईवर काहीसा परिणाम झाला आहे. मात्र तरी प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.