Kavita Medhekar on Vandana Gupte: कविता मेढेकर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. या मालिकेतील त्यांच्या पात्राने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. विशेष बाब म्हणजे कविता मेढेकर यांनी पहिल्यांदाच खलनायिकेची भूमिका साकारली होती.
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत कविता मेढेकर यांनी भुवनेश्वरी ही भूमिका साकारली होती. आईसाहेब व अधिपती या आई-मुलाच्या नात्यानेदेखील प्रेक्षकांची मने जिंकली. काही दिवसांपूर्वीच या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. आता अभिनेत्री त्यांच्या भूमिकेमुळे नाही तर त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कविता मेढेकरांनी वंदना गुप्तेंबाबत वक्तव्य केले आहे.
“वंदनाताईकडे बघितल्यानंतर मला…”
कविता मेढेकरांनी ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्याबरोबर ‘सुंदर मी होणार’ या नाटकात काम केले आहे. नुकतीच कविता मेढेकरांनी लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीत कविता मेढेकर म्हणाल्या, “वंदनाताईकडे बघितल्यानंतर मला असं वाटायचं की, काय कमाल बाई आहे, इतकी छान दिसते, छान तयार होऊन येते, उत्तम एनर्जीने काम करते.”
“व्यवस्थित तयार होणं हे मी तिच्याकडून शिकले आहे. अभिनेत्री म्हणून, जरी तुम्ही अभिनेत्री नसाल तरी प्रत्येक बाईने तिच्या तिच्या परीने व्यवस्थित तयार होऊन बाहेर पडावं, हे मी तिच्याकडून नकळतपणे शिकले. आवाज, एनर्जी कशी वापरायची हे तिच्याकडून शिकले. मला आठवतं की अगदी सुरुवातीच्या प्रयोगात ती मला सांगायची की, कविता आवाज वाढव. त्यामुळे मी स्वत:ला फार नशिबवान समजते की मला अशा छान लोकांबरोबर काम करता आलं.”
‘सुंदर मी होणार’ या नाटकात कविता लाड, वंदना गुप्ते यांच्याबरोबरच डॉ. श्रीराम लागू, गिरीश ओक, रवी पटवर्धन हे दिग्गज कलाकारदेखील होते. कविता मेढेकर असेही म्हणाल्या की, आपण ज्यांच्याबरोबर कामं करतो, त्यांचे आपल्यावर नकळतपणे संस्कार होतात. तसेच करिअरसाठी सासरकडून पाठिंबा होता असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कविता मेढेकर आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेनंतर कोणत्या भूमिकेत दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.