मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केलं. दुसरं उपोषण मागे घेताना त्यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून जनतेशी संवाद साधत आहेत. आज ते साताऱ्यात तीन सभा घेणार आहेत. त्यांच्या साताऱ्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी पोस्ट शेअर करत त्यांचं स्वागत केलं आहे.

किरण मानेंनी फेसबूक पोस्टमध्ये मनोज जरांगे पाटलांचं कौतुक केलं आहे. तसेच संविधानाने दिलेली ताकद त्यांनी दाखवून दिली आहे, असंही त्यांनी म्हटलं. “संविधानाने सामान्य माणसाला दिलेली ताकद जरांगे पाटलांनी दाखवून दिली. कारस्थानी वर्चस्ववाद्यांना बहुजनांमधले भ्रष्टाचारी लोक हाताशी धरून ‘फोडा आणि राज्य करा’चा ब्रिटीशी डाव खेळावा लागतोय. पण तो ही हाणून पाडायला संविधानानं शिकवलंय. जरांगे पाटील राजधानी सातार्‍यात तुमचे मनापासून स्वागत!” असं त्यांनी लिहिलंय. तसेच सोबतच त्यांनी जय शिवराय व जय भीम असे हॅशटॅगही दिले आहेत.

kiran mane welcomes manoj jarange patil
किरण मानेंची फेसबूक पोस्ट

दरम्यान, यापूर्वीही अनेकदा किरण माने यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं आणि उपोषणाचं समर्थन केलं आहे. मराठा आरक्षणासाठी साताऱ्यात साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची त्यांनी भेट घेतली होती. तसेच “जरांगे पाटील… या देशात एक सामान्य माणूस व्यवस्था हलवू शकतो, हे तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलंय. खरंतर असं पूर्वी घडणं सहज शक्य होतं, कारण व्यवस्थेला संविधानाचा धाक असण्याचा तो काळ होता. आजच्या भवतालात, संविधान गुंडाळू पाहणार्‍या व्यवस्थेला तो धाक ‘दाखवण्याचं’ महान कार्य तुम्ही करत आहात! आम्हाला तुमची गरज आहे,” अशी पोस्ट किरण माने यांनी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण चालू असताना केली होती.