मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आल्यावर “आपण बोलून मोकळं व्हायचं, निघून जायचं”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताना त्यात दिसत होतं. बुधवारी मराठा आरक्षणासंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेपूर्वीचा हा व्हिडीओ होता.

हेही वाचा : ‘असा’ असतो कविता मेढेकरांच्या घरचा गणेशोत्सव, म्हणाल्या, “सासूबाईंच्या निधनानंतर सासऱ्यांनी विचारलं की…”

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याची टीका केली. आपण व्हायरल व्हिडीओत दिसणारं संभाषण नेमकं का करत होतो? यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं होतं. पण एकूणच या व्हिडीओ प्रकरणावर मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध कवी किशोर कदम अर्थात सौमित्र यांनी एक सूचक कविता लिहिली आहे.

हेही वाचा : ‘बाजीराव मस्तानी’मधील ‘ते’ गाणं ऐकून नाना पाटेकर झाले होते नाराज, भन्साळींना थेट फोन करून म्हणाले…

लोकप्रिय कवी सौमित्र हे अभिनयाबरोबरच उत्तम कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात. आपल्या कवितेच्या माध्यमांतून ते अनेकदा सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाल्यावर यासंदर्भात किशोर कदम यांनी कोणाचेही नाव न घेता सूचक पोस्ट शेअर केली आहे.

किशोर कदम यांची कविता

आपण बोलून निघून जायचं ..

होईल जनतेचं जे व्हायचं
आपल्याला काय..
आपण बोलुन निघुन जायचं…
आपल्याला काय..

केवढी जनता असते समोर
आपल्या जीवाला नस्ता घोर
सगळेच पक्ष लावतात जोर
कोण साधून् कोण चोर

आपली तशीच विचारधारा
जिकडे जसा वाहिल वारा
घालत राहायच्या येरझारा
जातोच निसटुन हातुन पारा
हेच लक्षण लक्षात ठेऊन
आपण येत जात ऱ्हायचं
तहाने सारखं व्याकुळ व्हायचं

जकडे झरा तिथलं प्यायचं
आपल्याला काय…
आपण पिउन निघुन जायचं
आपल्याला काय…

लोकांची पण सहनशक्ती
आपण ताणुन बघत नुस्ती
लाऊन द्यायची त्यांच्यात कुस्ती
कैसा गांव कैसी बस्ती

आपलेच सगळे कार्यकर्ते
आपले कर्ते आपले धर्ते
जिधर घुमाव उधर फिरते
त्यांच्या हातात काय उरते
उद्या परवा विचार करू
नंतर त्यांना काय द्यायचं
आधी बघू काय खायचं

लोकशाहीचंच गाणं गायचं
आपल्याला काय..
आपण गाउन निघुन जायचं
आपल्याला काय..

चोविस तास बातम्या मिळोत
चॅनल्स जाहिराती गिळोत
न्याय अन्यायाशी पिळोत
एफबी इन्स्टा सारे फळोत

खड्डे सगळे तसेच सडोत
निकाल लांबणीवरती पडोत
नशिबाशी कामं अडोत
नको तशा घटना घडोत
जे जे हवं ते ते द्यायचं
तेवढ्या पुरतं त्राता व्हायचं

कशालाही नाही भ्यायचं
आपल्याला काय..
वचनं देउन निघुन जायचं
आपल्याला काय..

रोज लोकां समोर यायचं
रोज लोकां समोर जायचं
माईक बंद चालू असो
आपण फक्तं बोलत ऱ्हायचं

आपल्याला काय ..

सौमित्र.

दरम्यान, किशोर कदम यांनी या कवितेसह माइकचा फोटो शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, “रोखठोक सौमित्रदा…साहित्यिक कसा असावा तर वास्तवाला धरून लगेच परखडपणे व्यक्त होणारा आणि तुमच्यासारखा ताठ मनक्याचा असावा…वाह” अशी कमेंट केली आहे. तर, आणखी काही युजर्सनी “वाह…माइक चालू आहे सर!”, “नेमकं पकडलंय”, “व्यक्त होण्यासाठी प्रेरणा देताय तुम्ही…” अशा कमेंट्स सौमित्र यांच्या पोस्टवर केल्या आहेत. तसेच काही नेटकऱ्यांनी सद्यपरिस्थितीवर भाष्य केलं म्हणून त्यांचं कौतुकदेखील केलं आहे.

Story img Loader